सातारा, 15 मे (हिं.स.) : पाटण शहरातील मिलींद गुरव हा गेली तीन ते चार वर्ष पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता. अवघ्या दोन ते तीन मार्कांनी त्याच्या पदरी अपयश पडत होते. पण या अपयशाने न खचता तो पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतच होता. त्याच्या या प्रयत्नांना राज्य शासनाने हात दिला आणि त्याचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
मनिष गुरव हा भूकंपग्रस्त व्यक्तीच्या चौथ्या पिढीतील वारस म्हणजेच पणतू आहे. मनिषचे वडील नगरपंचायत पाटण येथे शिपाई पदावर कार्यरत आहेत. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेमच. शासनाने भूकंपग्रस्तांच्या चौथ्या पिढीपर्यंत भूकंपग्रस्तांचे दाखले देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. त्यामुळे मनिषला भूकंपग्रस्ताचा दाखला डिसेंबर 2022 मध्ये मिळाला. हा दखला मिळाल्याचा फायदा मनिषला पोलीस भरतीमध्ये झाला. समांतर आरक्षणाचा लाभ मिळून मनिष हा रत्नागिरी पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई पदावर भरती झाला. भूकंपग्रस्तचा दाखला मिळाल्यामुळे त्याला शासकीय नोकरी मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबात समाधानाचे व आनंदाचे वातावरण पहायला मिळते.
भूकंपग्रस्तांच्या चौथ्या पिढीपर्यंत म्हणजेच पणतू, खापरपणतू यांना भूकंपग्रस्त दाखला देण्याच्या निर्णयाचा फायदा कोयना परिसरातील अनेक भूकंपग्रस्त कुटुंबांना होत आहे. शासनाच्या या निर्णयाबद्दल कोयना परिसरातील कुटुंबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच हा निर्णय होण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करणारे पालकमंत्री शंभूराज देसाई, दाखला वितरणाची प्रक्रिया सुलभ केल्याबद्दल जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, स्थानिक प्रांताधिकारी सुनील गाढे यांना धनयवाद दिले आहेत.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply