Home राजकारण वैद्यकीय सुविधा अधिक बळकट करणार – डॉ. तानाजी सावंत

वैद्यकीय सुविधा अधिक बळकट करणार – डॉ. तानाजी सावंत

वैद्यकीय सुविधा अधिक बळकट करणार - डॉ. तानाजी सावंत

छत्रपती संभाजीनगर, 14 मे (हिं.स.)

राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागात आवश्यक असलेल्या वैद्यकीय पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासोबतच आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला देशात अव्वल क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी आपण सर्व मिळून काम करूया, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगर तसेच लातूर विभागातील आरोग्य सेवेचा आरोग्य मंत्री सावंत यांनी आज आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त संचालक डॉ.रघुनाथ भोई, सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, डॉ. बी. एस.कमलापूरकर, औरंगाबाद विभागाच्या उपसंचालक डॉ. महानंदा मुंडे, लातूर विभागाचे उपसंचालक डॉ.पी. एम.ढोले उपस्थित होते.

आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले, रुग्णाला दर्जेदार आरोग्य सेवा देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. आपण आपली सेवा प्रामाणिकपणे पार पाडत असून शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आरोग्य विभागातर्फे राज्यात १८ वर्षावरील महिला, गरोदर स्त्रीया, माता यांच्या आरोग्य तपासणीसाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ आणि शून्य ते अठरा वर्षांपर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ हे अभियान राबविण्यात येत आहे. अशा अभियानामुळे राज्याच्या आरोग्य सेवा सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.

कोरोना काळात आरोग्य यंत्रणेने जीवाची पर्वा न करता निस्वार्थपणे सेवा दिली आहे. आरोग्य यंत्रणेचे प्राथमिक आरोग्य केंद्रापासूत ते जिल्हा रूग्णालयापर्यंत सेवा देणारी यंत्रणा चांगले काम करते आहे. आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासोबतच फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. जिल्हा व विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी केले.

सामान्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी आपला दवाखाना उपक्रम सुरू केला आहे. आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. राज्यात सद्यस्थितीत 317 दवाखाने सुरू आहेत. या दवाखान्यात वाढ करण्यात येत आहे. आपल्या दवाखान्यात येणाऱ्या रूग्णांच्या नोंदी अद्ययावत ठेवा व याबाबतच प्रत्येक पंधरा दिवसाला शासनास अहवाल सादर करा, असे निर्देश देत रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद आरोग्य विभागाचे आहे.त्यानुसार आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करूया, असे आवाहनही डॉ.सावंत यांनी केले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.