मुंबई, 14 मे (हिं.स.) : कोळसा मंत्रालय 15 मे रोजी मुंबईत भारताच्या जी-ट्वेंटी (G20) अध्यक्षपदा अंतर्गत ‘कोल इंडिया लिमिटेड’ (CIL) च्या सहकार्याने ‘जस्ट ट्रान्झिशन रोडमॅप’ या विषयावर आधारित चर्चासत्र आयोजित करणार आहे. हे तीन दिवसीय चर्चासत्र जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित केले जाईल. भारताच्या जी-ट्वेंटी (G20) अध्यक्षपदा अंतर्गत होणाऱ्या तिसर्या एनर्जी ट्रान्झिशन (ऊर्जा संक्रमण) कार्य गटाच्या (ETWG) बैठकीचा एक भाग म्हणून या चर्चासत्राचे आयोजन केले जाईल.
जी-ट्वेंटी (G20) च्या एनर्जी ट्रान्झिशन (ऊर्जा संक्रमण) कार्य गटाच्या बैठकीत (ETWG) चर्चेत सहभागी होणाऱ्या मंत्रालयांपैकी एक कोळसा मंत्रालय आहे. इटीडब्ल्यूजी (ETWG) ची पहिली बैठक फेब्रुवारी महिन्यात बेंगळुरूमध्ये आणि दुसरी बैठक एप्रिल, 2023 मध्ये गांधीनगर, गुजरात येथे झाली होती. 15 ते 17 मे या कालावधीत मुंबईत होणाऱ्या इटीडब्ल्यूजी (ETWG) च्या तिसऱ्या बैठकीत ऊर्जा संक्रमणाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा सुरू राहील.
‘जस्ट ट्रान्झिशन रोडमॅप’ या विषयावरील चर्चासत्रात दोन सत्रे असतील; म्हणजे, उद्घाटन सत्र, त्यानंतर पॅनेल चर्चा सत्र होईल. कोळसा सचिव अमृत लाल मीना यावेळी होणाऱ्या चर्चेत सहभागी होतील आणि ते या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष पदही भूषवतील. जागतिक बँक आणि सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाईन इन्स्टिट्यूट (CMPDI) देखील या चर्चासत्रा दरम्यान न्याय्य संक्रमण पैलूंवर सादरीकरण सादर करतील. मुख्य भागधारकांमध्ये सर्वसमावेशक संवाद साधणे हे या चर्चासत्राचे उद्दिष्ट आहे. शाश्वततेकडे संतुलित दृष्टिकोनाची गरज ओळखून, या चर्चासत्रात जीवाश्म इंधन विशेषत: कोळशावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थांपासून देशाच्या ऊर्जा सुरक्षेशी तडजोड न करता अधिक शाश्वत ऊर्जा स्रोतांकडे सुरळीत आणि न्याय्य संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी धोरणे आणि उपक्रमांबाबत सविस्तर उहापोह होईल.
या चर्चासत्र दरम्यान, कोळसा क्षेत्रातील शाश्वत आणि पर्यावरण-स्नेही उपक्रमांवर प्रकाश टाकणारा व्हिडिओ प्रदर्शित केला जाईल. कोळसा क्षेत्रात ‘जस्ट ट्रान्झिशनसाठी’सर्वोत्कृष्ट जागतिक पद्धतींचा अभ्यास अहवाल आणि बायो-रिक्लेमेशन/प्लांटेशन, इको-पार्क/माइन टुरिझम, आणि जस्ट ट्रांझिशनवर माइनटेकच्या जी-ट्वेंटी (G20) विशेष आवृत्तीच्या तीन पुस्तिकाही प्रसिद्ध केल्या जातील.
हे चर्चासत्र भारत आणि परदेशातील तज्ञांना त्यांचे विचार, अनुभव आणि जस्ट ट्रांझिशन संबंधित सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी योग्य व्यासपीठ प्रदान करेल. यावेळी सहभागी होणारे तज्ञ परस्परसंवादी सत्र आणि चर्चासत्रात सहभागी होतील. या चर्चासत्रात सरकारी अधिकारी, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, उद्योग जगतातील नेते आणि नामवंत शिक्षणतज्ज्ञांसह मान्यवरांची उपस्थिती असेल. हा कार्यक्रम हरित आणि अधिक शाश्वत समृद्धीकडे सामूहिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी सहभागींमध्ये सखोल चर्चा, ज्ञानाची देवाणघेवाण तसेच सहकार्याला प्रोत्साहन देईल.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply