चंद्रपूर, ३० मे (हिं.स.) : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ते ४८ वर्षांचे होते. धानोरकर यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले असा परिवार आहे.
खासदार बाळू धानोरकर पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे, मंगळवारी दुपारी २ वाजेपासून ३१ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर ३१ मे रोजी वणी – वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. ४८ वर्षाच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार असा थक्का करणारा प्रवास केलाय.
२६ मे रोजी त्यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. ते उपचाराला प्रतिसाद देत असतानाच त्यांची मंगळवार ३० मे रोजी पहाटे प्राणज्योत मालवली. दोन दिवसाआधी कुटुंबाचा आधारवड पिता नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते.
धानोरकर यांची राजकीय कारकीर्द
काँग्रेसमध्ये येण्याआधी बाळू धानोरकर शिवसेनेचे वरोरा विधानसभा मतदारसंघातील आमदार होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत लोकसभेची निवडणूक लढवली. लोकसभा निवडणुकीत ते चंद्रपूरच्या मतदारसंघातून विजयी झाले होते.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply