अहमदनगर, 30 मार्च (हिं.स.):- महापौरांच्या प्रभागातील वारुळाचा मारुती मंदिर परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असताना संतप्त नागरिकांनी खड्डेमय रस्त्यात रिकाम्या खुर्चीला हार घालून लोकप्रतिनिधी व प्रशास नाचा निषेध नोंदवला .खड्डेमय रस्ते,धुळीचा फुफाटा व पाणी टंचाईच्या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
युवा सेनेचे शहर प्रमुख महेश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सुशील चेन्नुर,ओमकार लेंडकर आदींसह महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारुळा चा मारुती मंदिर कमान ते मंदिरा लगत असलेल्या एमएसईबी सबस्टेशन पर्यंत रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून,सिना नदीच्या पुलावर तर पावसाळ्यात आलेल्या पूरामुळे अक्षरश: रस्ता वाहून गेला आहे.पूल अत्यंत धोकादायक बनला आहे.या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने मोठ्या प्रमाणात उडणार्या धुळीच्या फुफाट्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.मागील दोन वर्षापासून नागरिक या रस्त्या ची दुरुस्ती करण्याची मागणी करत असून,स्थानिक लोकप्रतिनिधी हा रस्ता मंजूर असल्याचे उत्तरे देत आहेत. मात्र अद्यापि या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आलेले नसल्याचे महेश लोंढे यांनी सांगितले.
या भागात पाच घरां साठी एक नळ कनेक्शन असून,त्याला देखील पाणी येत नसल्याने उन्हाळ्यात पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.धुळीमुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.नवीन फेज टू नळ योजनेचे फक्त पाईप टाकण्यात आले असून,त्या नळाद्वारे कधी पाणी येणार? असा प्रश्न स्थानिक महिलांनी उपस्थित केला.वारुळाचा मारुती मंदिर कमान ते मंदिरा लगत असलेल्या एमएसईबी सबस्टेशन पर्यंत रस्त्याचे काम मार्गी लावावे,धोकादायक पूलाची दुरुस्ती करावी व या भागातील पाण्याचा प्रश्न त्वरीत सोडविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply