मुंबई, 29 मे (हिं.स.) : महाराष्ट्रात सदनात सावरकर जयंती साजरी करताना राजमाता अहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला करण्यात आले. समाजाच्या प्रेरणास्रोत असलेल्या या दोन महान व्यक्तींचा अपमान होणे ही संताप आणणारी घटना असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवण्याच्या प्रकाराचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निषेध केला आहे. पत्रकारांशी बोलताना पटोले पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष महिलांचा सन्मान करत नाही त्यांच्या महिला विरोधी मानसिकतेतूनच असे प्रकार घडत असतात. सत्तेच्या बळावर भाजपा काहीही करु शकते, तेच महाराष्ट्र सदनातही झाले. सत्तेच्या बळावर नवा इतिहास निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात सदनात झालेला प्रकार चिड आणणार असून या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे. जगाच्या पाठीवर महात्मा गांधी, बुद्धाची आठवण येते आणि देशात येताच भाजपाला या महापुरुषांचा विसर पडतो असा टोलाही पटोले यांनी लगावला.
विधानसभा, लोकसभा निवडणुकांपर्यंत मीच प्रदेशाध्यक्ष..
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपर्यंत मीच प्रदेशाध्यक्षपदावर राहणार आहे. मागील तीन चार दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्या चुकीच्या आहेत, त्यात काहीही तथ्य नाही. राज्यातील काही नेते दिल्लीत वरिष्ठ नेत्यांना भेटले त्याचा आणि प्रदेशाध्यक्षपदाचा विषय याचा काहीही संबंध नाही.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply