नवी दिल्ली, 29 मार्च (हिं.स.) : भारताने जगाला नेहमीच शांती आणि बंधुत्वाचा संदेश दिला आहे. संपूर्ण मानवतेसाठी सांस्कृतिक संदेशातून भारताच्या सॉफ्ट पॉवरची जाणीव सगळ्यांना देणे हा एक महत्त्वाचा भाग आहे, त्यातूनच आपण मोठा परिणाम साधू शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. भारतीय माहिती सेवेच्या 2018 ते 2022 च्या तुकडीतील अधिकारी तसेच प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आणि भारतीय नौदल आयुध सेवेच्या प्रोबेशनर्सनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आज राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली.
अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या, सरकारची धोरणे आणि कामकाजांबद्दल नागरिकांना माहिती देण्यासाठी संपर्क हा महत्त्वाचा घटक आहे. प्रभावी संपर्क आणि योग्य माहिती यातूनच माहिती सेवेचे अधिकारी नागरिकांना देशाच्या प्रगतीबद्दल योग्य माहिती असणारे भागीदार बनवण्याच्या दिशेने काम करू शकतात.
आज माहितीच्या व्यापक आणि ताबडतोब होणाऱ्या प्रसाराबरोबरच तितक्याच वेगाने खोटी माहिती पसरण्याचा धोका अधिक वाढला आहे. भारतीय माहिती सेवेच्या अधिकाऱ्यांनी अशा असत्य बातम्यांना आळा घालण्याची जबाबदारी घ्यायला हवी.. त्यांनी अधिकाऱ्यांना तंत्रज्ञान आत्मसात करून माध्यमांच्या विशेषतः समाज माध्यमांचा गैरवापर करून चुकीचे कथन रुढ करण्यावर नजर ठेवण्याची विनंती केली. जागतिक व्यासपीठावर भारताची उत्तम प्रतिमा करण्याच्या बाबतीत भारतीय माहिती सेवेतील अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या.
भारतीय नौदल आयुध सेवेच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपतींनी सांगितले की, भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाला शस्त्रास्त्रांची परिणामकारक आणि सुरक्षित वाहतूक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी केले.तंत्रज्ञानातील प्रगती आणि नव्याने तयार होणारी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे यातून तुम्ही स्वदेशीकरणाचे लक्ष्य गाठण्यासाठी नवोन्मेषासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. गेल्या काही दशकांमध्ये स्वदेशीकरणाच्या संदर्भात बरेच काही साध्य झाले असले तरीही आता सध्याचा काळ हा मेक इन इंडियाची दूरदृष्टी घेऊन तांत्रिक दृष्ट्या अत्याधुनिक साहित्य भारतातच उत्पादित करण्याच्या नवीन सिद्धतेचे बीज रुजवण्याचा आहे.भारतीय सशस्त्र नौदल सेवेच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींनी शस्त्रसज्ज नौदल आणि आत्मनिर्भर भारत याच्यातील दूरदर्शीपणा या माध्यमातून स्वनिर्भरता साध्य करण्यासाठी मनापासून सहयोग देण्याचे आवाहन केले. आपले पद म्हणजे प्रचंड जबाबदारी आणि उत्तरदायित्व आहे अधिकाऱ्यांनी नेहमी लक्षात ठेवावे असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला. त्या म्हणाल्या की अगदी प्रत्येक निर्णय आणि कृती यांचा परिणाम नागरिकांवर अप्रत्यक्षरीत्या होणार आहे म्हणूनच आपले लक्ष्य हे देशाच्या विकासाच्या लक्ष्याबरोबर मेळ राखणारे असायला हवे तसेच नागरिकांच्या कल्याणासाठी असायला हवे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply