रत्नागिरी, 28 मे, (हिं. स.) : भारताला हिंदुराष्ट्र बनविण्यासाठी स्वा. सावरकर यांनी हिंदुत्व ग्रंथ लिहिला. त्याची यंदा शताब्दी सुरू आहे. भारतीय संस्कृतीचे रक्षण, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येथे केले.
महाराष्ट्र शासनाने वीरभूमी परिक्रमेअंतर्गत पर्यटन संचालनालय, मुंबईतील विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताह आयोजित केला होता. शोभायात्रा आणि सहभोजनाने आज त्याची सांगता झाली. त्यावेळी श्री. लोढा बोलत होते.
ते म्हणाले, शंभर वर्षांपूर्वी समाजातील सर्वांना मंदिरात प्रवेश मिळावा, यासाठी स्वा. सावरकरांच्या सांगण्यावरून भागोजीशेठ कीर यांनी पतितपावन मंदिर उभारले. या मंदिरात वीर सावरकरांनी मंदिरात सहभोजन सुरू केले. या दोघांनाही अभिवादन करतो. आजचे हे राजकीय व्यासपीठ नव्हे. हा हिंदुत्वाचा कार्यक्रम आहे. वीर सावरकरांनी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतमातेला परकीय शक्तीपासून मुक्त करेन अशी शपथ घेतली. कारण त्याशिवाय भारतात हिंदुराष्ट्राची स्थापना होणार नाही, हे त्यांना माहिती होते. त्यांनी मोठा त्याग, तपस्या, लढाई केली. राज्यात याआधीच्या महाविकास आघाडीने तुष्टीकरणाचे राजकारण केले, असे सांगून श्री. लोढा म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वासाठी एकत्र येत, स्वा. सावरकरांची प्रेरणा घेत भाजपा-शिवसेना युतीचे सरकार स्थापन केले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच ही नैसर्गिक युती अनेक वर्षे टिकली. अनैसर्गिक युती पसंत पडली नाही. हिंदुत्व मानणाऱ्यांना एकत्र यावे लागेल. कुटुंबात एखादा मुद्द्यावर वादविवाद होऊ शकतो. पण हिंदुत्वासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.
भाजप-सेना सरकार का स्थापन झाले याबाबत ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्व महत्त्वाची खाती होती. परंतु त्यांच्यासह २० मंत्र्यांनी सरकार सोडले आणि युती केली. यामागे स्वा. सावरकरांची प्रेरणा होती, हिंदुत्वाची कल्पना होती. रत्नागिरी हे टिळकांचे जन्मस्थान, तर वीर सावरकरांचे येथे अनेक वर्षे वास्तव्य होते. त्यांनी आपले सर्वस्व भारतीय संस्कृती रक्षण, हिंदुत्वासाठी, राष्ट्रासाठी वाहिले. आज त्यांचा आत्माही इथेच कुठेतरी फिरत असेल. आता आपली सर्वांची जबाबदारी आहे. छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे. आज मोठ्या संख्येने सावरकरप्रेमी आले आहेत. त्यांच्या मनात त्याग, तपस्या, अर्पणभाव आहे. भारतीय संस्कृतीचे रक्षण करावे व पुन्हा अखंड भारत करावा.
यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वाट्टेल त्या पद्धतीने, खालच्या स्तरावरून टीका केली गेली. ज्यांना स्वातंत्र्यवीर कळले नाहीत, त्यांचा इतिहास कधी वाचला नाही, त्यांनी सावरकरांचे नावसुद्धा घेणे निषेधार्ह आहे. रत्नागिरीतही सोशल मीडियावरून चांगल्या कामाची बदनामी करत चुकीचे संदेश व्हायरल करणाऱ्या शक्तींचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल. अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचे नाही, नाहीतर त्या वाढतात. देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची पहिली आरती वीर सावरकरांनी लिहिली. हा इतिहास लोक विसरू लागले आहेत. त्या सावरकरांची चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतला. दहा महिन्यांपूर्वी राजकीय बदल झाला आणि शिंदे-फडणवीस सरकाराने इतिहासात प्रथमच २८ मे हा सावरकरांची जयंतीचा दिवस सावरकर गौरव दिन म्हणून साजरा करायचे जाहीर केले. पुढच्या पिढीला सावरकरांचा चुकीचा इतिहास सांगितला जातो. तो बदलायला हवा. कारण देशात सावरकरांच्या बदनामीची मोहीम आखली जात आहे.
श्री. सामंत म्हणाले, रत्नागिरीकर सावरकरांच्या विचाराने प्रेरित असल्यामुळे देशाबद्दलचे प्रेम व्यक्त होते. हा उत्सव ३६५ दिवस झाला पाहिजे. सावरकरांचा विचार राज्यात पोहोचला पाहिजे याकरिता मोहीम उघडण्याची गरज आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त म्हणून काम करतो. आम्ही काही लोकांना आवाहन केले आणि मधुसूदन कालेलकर लिखित सागरा प्राण तळमळला हे नाटक ३ जूनपासून महाराष्ट्रात दाखवले जाणार आहे. वि. दा. सावरकर स्मारक मुंबईत झाले व वीस वर्षांपूर्वी सावरकर नाट्यगृह रत्नागिरीत झाले. त्या वेळी नामकरणाचे धाडस उमेश शेट्ये यांनी केले. आज ते हयात नाहीत. पण त्यांचे नाव घेतले पाहिजे, असे मंत्री सामंत आवर्जून म्हणाले.
आपण सोशल मीडियाचा फार मोठा विचार करायला लागलो आहोत. एका विद्वानाने गोडबोले नगरच्या शाळेजवळ वेगळ्या धर्माचे काहीतरी वेगळे निर्माण करण्याचे काम महाराष्ट्र शासनातर्फे केले जात आहे, अशी पोस्ट व्हायरल केली. त्याने भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले. ते नतद्रष्ट आहेत. गोडबोले विद्यालयात अशी कोणतीही वास्तू होणार नाही, की शरमेने मान खाली घालावी लागेल. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की अशी कुठची शक्ती आहे जी सावरकरांच्या विचारांना धक्का देत आहे. आपण ही शक्ती शोधली पाहिजे. ही प्रवृत्ती ठेचली पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीच्या पोस्ट व्हायरल केल्या जातात. चांगल्या कामाला बदनाम केले जाते. आपण अशा प्रवृत्तींकडे दुर्लक्ष केले तर त्या वाढतात. सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. रत्नागिरीच्या विकासाच्याकरिता क्रांतीकारी विचाराने, सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे, असेही सामंत म्हणाले.
सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे अध्यक्ष, पद्मश्री दादा इदाते म्हणाले की, १९२३ ला सावरकरांनी हिंदुत्व ग्रंथ लिहिला. देशाला पितृ व पुण्यभूमी म्हणतो तो हिंदू अशी व्याख्या त्यांनी केली. डॉ. आंबेडकरांनी १९२४ साली बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली व शिका, संघर्ष करा असा संदेश दिला. डॉ. हेडगेवार यांनी १९२५ मध्ये रा. स्वा. संघाची स्थापना केली. देशाच्या संरक्षणासाठी सावरकरांनी योगदान केले. सावरकरांनी रत्नागिरीत असताना १९२४ ते ३७ या काळात सामाजिक कामांची सुरवात केली. त्यांनी परदेशांतून पिस्तुल पाठवली. त्यातील एक पिस्तुल हुतात्मा कान्हेरे यांना मिळाले. त्यांनी जॅक्सनचा खून केला. त्याचा शोध घेताना सावरकांनी हे पिस्तूल पाठवल्याचे लक्षात आले. हेग न्यायालयात हा विषय आला. भारतीय स्वातंत्र्याचा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला. त्याचे कारण सावरकर होते. सावरकरांनी जात्युच्छेदक निबंध ग्रंथ लिहिला व त्यात एकात्म हिंदुत्वाची हाक दिली. आज आपण दिशेने जातो आहोत.
पतितपावन मंदिर संस्थेचे माजी अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर यांनी रत्नागिरी शहराशी असलेले सावरकरांचे नाते स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावरकर विचार जागरण सप्ताहाचे संयोजक रवींद्र भोवड म्हणाले की २१ ते २८ मे या कालावधीत राज्यात पाच ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. रत्नागिरीमध्ये रांगोळी स्पर्धा, पथनाट्ये, वाळूशिल्पे, दुचाकी फेरी, शोभायात्रा, नाट्यप्रयोग, संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले. त्याला रत्नागिरीकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply