वाशिम, 28 एप्रिल (हिं.स.) : जिल्हयात येत्या खरीप हंगामात खताची कमतरता जाणवणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी. कृषी केंद्रांनी कोणत्याही कंपनीच्या खतांची साठेबाजी करु नये. जबरदस्तीने खतांसोबत शेतकऱ्यांना अन्य वस्तू घेण्याचा आग्रह कंपनीने कृषी केंद्रामार्फत शेतकऱ्यांना करु नये. खतांचे दर कमी झाले असल्यास कमी झालेल्या दरानेच खतांची विक्री कृषी केंद्रांनी करावी. शेतकऱ्यांची विक्री दराबाबत फसवणूक करु नये. कृषी केंद्रांना देण्यात येणाऱ्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे अन्यथा पालन न करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची आढावा बैठक षन्मुगराजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.षन्मुगराजन म्हणाले, कंपन्यांनी आपल्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी. कृषी केंद्रांनी एका विशिष्ट कंपनीची उत्पादीत निविष्ठा खरेदी करण्याबाबत शेतकऱ्यांना आग्रह करु नये. शेतकऱ्यांना माती परिक्षण करण्यास कृषी विभागाने प्रोत्साहीत करावे. जमिनीमध्ये सल्फरचे प्रमाण कमी असल्यास सल्फरचा वापर करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना द्यावा. शेतकऱ्यांनी बियाण्यांची बॅग फोडल्यानंतर त्यातील बियाणे योग्य प्रकारचे नाही असे वाटत असेल तर ते बियाणे विक्रेत्याने परत घ्यावे, असे त्यांनी सांगितले.
तोटावार म्हणाले, पोत्यातील रासायनिक खताच्या वापरापेक्षा लिक्वीड नॅनो युरीया वापरतील यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करावे. ज्या कंपनीचे बियाणे कृषी केंद्राकडे येईल, त्या विक्रेत्याने त्या बियाण्यांची उगवण क्षमतेची खात्री करुन बियाण्यांची विक्री करावी.कृषी निविष्ठांच्या तपासणीसाठी भरारी पथके व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहे. वाशिम येथील रेल्वे स्टेशनवर खताच्या रॅक पॉईंटसाठी अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. सन 2023-24 या वर्षात 3 लक्ष 4 हजार 80 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी प्रस्तावित आहे. 61 हजार 876 हेक्टरवर तूर, 2626 हेक्टरवर मुग आणि 28 हजार 167 हेक्टरवर कापसाची लागवड प्रस्तावित आहे. 2 लक्ष 28 हजार 60 क्विंटल सोयाबीन बियाणे, तुरीचे 7 हजार 425 क्विंटल बियाणे लागवडीसाठी लागणार आहे. खरीप- 2023 हंगामाकरीता 17 हजार 211 शेतकऱ्यांनी बियाणे राखून ठेवले आहे. 75 हजार मेट्रीक टन युरीया, डीएपी, एमओपी, एसएसपी आणि संयुक्त व मिश्र खताची मागणी करण्यात आली आहे. खरीप हंगामाकरीता खताचे मंजूर आवंटन 70 हजार 50 मे टन इतके असून एकूण खताची उपलब्धता 43 हजार 645 मेट्रीक टन असल्याची माहिती तोटावार यांनी यावेळी दिली.
सभेत निविष्ठा पुरवठा व दर्जाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारी व त्याचे निवारण करणे निविष्ठांच्या किंमती नियंत्रणाबाबत, जिल्हयातील शेतकऱ्यांना योग्य निविष्ठांचा योग्य वेळी पुरवठा करणे, बाहेर राज्यातून अवैधरित्या अनधिकृत बियाण्यांचा जिल्हयात पुरवठा व विक्री होणार नाही या याविषयासह गुण नियंत्रणासाठी गठीत केलेल्या पथकाचे काम परिणामकारक होण्यासाठी पोलीस व महसूल यंत्रणा तसेच अन्य यंत्रणांशी समन्वय साधण्याविषयी चर्चा करण्यात आले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply