शिर्डी, 26 मार्च (हिं.स.) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी येथे पशुसंवर्धन विभाग़ाच्या ‘महापशुधन एक्स्पो-२०२३’ चा समारोप झाला. पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खासदार सदाशिव लोखंडे आणि डॉ. सुजय विखे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी हा आपला केंद्रबिंदू असून शेतकरी आदर्श मानूनच शासन काम करत आहे. महापशुधन सारख्या एक्स्पोमधून शेतकऱ्यांना विविध विषयांची माहिती देण्यात आली. ८ लाख शेतकरी पशु पालकांनी याला भेट दिली असे सांगून लम्पीमुक्त पशुधन करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने उल्लेखनीय काम केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागाचे कौतुक केले.
शेतकऱ्यांना न्याय देणारे हे सरकार आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना सन्मान निधी देण्यात येणार आहे. पंचामृतामध्ये शाश्वत शेतीला प्राधान्य देण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारचे मोठे पाठबळ मिळत आहे, या राज्यात शेतकऱ्यांना चांगले दिवस आले पाहिजे हा आमचा एकच आणि महत्त्वाचा अजेंडा असून त्यासाठी हे सरकार काम करीत आहे असे सांगून शिर्डी येथे थीम पार्क उभारण्यासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply