सांगली, 26 मे (हिं.स.) : बचत गटांनी उत्पादित केलेला माल हा चांगल्या दर्जाचा आणि गुणवत्तापूर्ण असतो. या उत्पादनाचे चांगल्या प्रकारे मार्केटिंग होण्यासाठी गुणवत्ता पूर्ण पॅकिंग असावे लागते. यासाठी बचत गटांनी आता मार्केटिंग व पॅकिंगकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने सांगली येथील 7 Avenue MALL येथे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आ. गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, बँक ऑफ महाराष्ट्रचे नितीन सर्वगोड यांच्यासह विविध बँकेचे प्रतिनिधी व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
बचत गटांनी उत्पादित केलेल्या अनेक उत्पादनाच्या विक्रीच्या माध्यमातून ग्रामीण भागात नवी अर्थव्यवस्था रुजत आहे. बचत गटांच्या उत्पादनाना मोठ्या शहरात बाजारपेठ उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागाचा आर्थिक कायापालट अधिक गतीने होईल, असा विश्वास व्यक्त करून आ. गाडगीळ म्हणाले, बचत गटांच्या मालाची विक्री होण्यासाठी जिल्हा तालुका व गाव स्तरावर चांगली व्यवस्था करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल. तसेच बचत गटांना महापालिकेकडील गाळे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे म्हणाल्या, बचत गटाच्या उत्पादनाने गुणवत्तेमध्ये आपला वेगळा ठसा निर्माण केलेला आहे. बचत गटांनी उत्पादित केलेली उत्पादने ही गुणवत्ता व दर्जेदार उत्पादनाची हमी आहे. बचत गटाच्या माध्यमातून उत्कृष्ठ उत्पादने निर्माण करणारी ही चळवळ अधिक वृद्धिंगत होईल व यामध्ये अन्य महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी बचत गटांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
महिला ही उत्पादक शक्ती आहे. ती घर सावरते, सजवते आणि फुलवतेही. त्यामुळे बचत गटातील महिलांनी केवळ लोणची पापड यासारख्या उत्पादनात अडकून न पडता नवीन उत्पादनाचे मार्ग व पर्याय शोधले पाहिजेत, असेही जिल्हा माहिती अधिकारी पाटोळे म्हणाल्या.
बँक ऑफ महाराष्ट्रचे नितीन सर्वगोड म्हणाले, बचत गटाच्या माध्यमातून नव उद्योजक तयार होण्यासाठी बचत गटांनी आता उद्योजकतेकडे वळावे. बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला गुणवत्ता चांगली असल्याने बचत गटांचा मोठा ब्रँड विकसित होत आहे ही मोठी जमेची बाजू आहे. बँकाही आता बचत गटांना ना नफा ना तोटा तत्वावर कर्ज पुरवठा करीत असल्याचेही ते म्हणाले.
कृषी विभागामर्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न योजना राबविली जात आहे. या योजनेच्या लाभ महिला व बचत गटांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी यावेळी केले.
बचत गटांनी उत्पादित मालाची गुणवत्ता चांगली ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करून डॉ. किरण पराग म्हणाले ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या उत्पादनाला शहरात हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी कुंदन शिनगारे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बनशंकरी महिला बचत गट, स्वयं महिला बचत गट, देवनाळ, सेवा सदन महिला बचत गट, म्हैसाळ, श्री समर्थ महिला बचत गट बेडग, एकता महिला बचत गट पदमाळे आणि धनश्री महिला बचत गट म्हैसाळ या बचत गटांना मंजूर करण्यात आलेल्या कर्जाचे धनादेश देण्यात आले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply