Home राजकारण लोकप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संसदीय आयुधांचा प्रभावी वापर आवश्यक – राहुल नार्वेकर

लोकप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संसदीय आयुधांचा प्रभावी वापर आवश्यक – राहुल नार्वेकर

लोकप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संसदीय आयुधांचा प्रभावी वापर आवश्यक - राहुल नार्वेकर

मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.) : “विधिमंडळ सभागृहाच्या कामकाजाची यशस्विता ही लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागातून निष्पन्न होत असते. या पार्श्वभूमीवर, लोकप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लोकप्रतिनिधींनी संसदीय आयुधांचा प्रभावीरित्या वापर करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर यांनी येथे केले.

विधानभवन येथे आयोजित वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्यातर्फे विधानपरिषद सदस्यांसाठीच्या कृतिसत्र कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सन्माननीय आमदार ॲड. अनिल परब, विक्रम काळे, विलास पोतनीस, किरण सरनाईक, सुधाकर आडबाले, अरुण लाड, ज्ञानेश्वर म्हात्रे, वजहात मिर्झा, अभिजित वंजारी, आमशा पाडवी, श्रीमती. उमा खापरे, ॲड. मनिषा कायंदे, धिरज लिंगाडे विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, सहसचिव शिवदर्शन साठे, उपसचिव ऋतुराज कुडतरकर, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, संचालक निलेश मदाने, महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे सेवानिवृत्त प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे, सेवानिवृत्त सहसचिव डॉ. विलास आठवले, सेवानिवृत्त प्रधान सचिव विलास पाटील हे उपस्थित होते.

कृतिसत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात अॅड. नार्वेकर म्हणाले की, कायदेमंडळ नियमावलीच्या अभ्यासातून लोकप्रतिनिधी अधिक उत्तमरित्या विधानपरिषद सदस्य म्हणून काम करु शकतात. आपल्या मतदार संघातील प्रश्नांची प्रभावीपणे मांडणी करुन त्याची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने अधिवेशनचा उपयोग शक्य होतो, हे लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींना, प्रामुख्याने नवनिर्वाचित आमदारांना संसदीय आयुधांची माहिती असणे अतिशय आवश्यक आहे. त्यादृष्टीने हे कृतिसत्र निश्चितच उपयुक्त, दिशादर्शक असून संसदीय लोकशाही बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. याची व्याप्ती ही केवळ उपस्थित विधानपरिषद सदस्यांपुरतीच नसून त्यांच्या माध्यमातून राज्यातील तेरा कोटी जनतेला त्यांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवून घेण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होत आहे.

सभागृहाच्या कामकाजात सहभागी होताना सदस्यांना संसदीय आयुधांचा अभ्यास असल्यास जनतेच्या प्रश्नांची प्रभावी मांडणी,सोडवणूक यासह पीठासीन अधिका-यांद्वारा करण्यात देण्यात येणारा निर्णय नियमानुसार आहे का,आपण मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित मंत्र्यांकडून देण्यात येणारे उत्तर, स्पष्टीकरण हे चौकटीत आहे का, याची शहानिशाही सदस्य करु शकतात. ‘लक्षवेधी’ हे सभागृहात आपले प्रश्न मांडण्यासाठीचे प्रभावी माध्यम आहेच, त्या व्यतिरिक्त ही इतर अनेक संसदीय आयुधे आहेत. त्यांच्या योग्य वापरातून आपल्या प्रश्नांना न्याय मिळवून घेऊ शकतो. विशेषाधिकार समिती, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींना विशेषाधिकार देण्यामागचा उद्देश त्यांना दबावविरहीत काम करता यावे असा आहे. त्याचसोबत विशेषाधिकार अबाधित रहावे, यासाठी लोकप्रतिनिधींनी संतुलितपणे विशेषाधिकारांचा वापर करावा. संसदीय लोकशाही जपण्याची जबाबदारी लोकप्रतिनीधींवर आहे, हे लक्षात घेऊन संसदीय आयुधांचा अभ्यास आणि वापर करण्याचे आवाहन यावेळी विधानसभा अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर यांनी केले. तसेच लोकप्रतिनिधींना संसदीय आयुधांची माहिती देणारे उपयुक्त कृतिसत्र आयोजित केल्याबद्दल ॲड.नार्वेकरांनी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे अभिनंदन केले.

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, विधान परिषद सदस्यांना संसदीय आयुधांची, कार्यपद्धतीची माहिती, नियमावलीचा अभ्यास असणे गरजेचे आहे. सभागृहाचा वेळ अधिकाधिक फलद्रुप होण्याच्या दृष्टीने नेमकेपणाने प्रश्न उपस्थित करणे,मंत्र्यांनी जबाबदारीपूर्वक उत्तर देणे,सदस्यांनी चर्चेत सहभाग घेणे,सभागृहाच्या कामकाजात सक्रियपणे सहभाग नोंदवला पाहिजे.लक्षवेधी, इतर प्रश्न हे किती संख्येने उपस्थित करतो याचा नवनिर्वाचित सदस्यांनी आर्वजून विचार करावा. आपल्या मतदार संघाच्या प्रश्नांसोबतच राज्यातील महत्वाचे प्रश्नदेखील सभागृहात चर्चेला आलेच पाहिजेत, याची एकत्रित जबाबदारी घेऊन सर्व सदस्यांनी प्रश्न,लक्षवेधी उपस्थित करावी. प्रभावीपणे काम करण्यासाठी नियमावलीचा अभ्यास,प्रश्नांची मांडणी यासोबतच सुसंवादीपणा जपावा,याच्या माध्यमातून विधायक कामे पुढे नेण्यासाठी लोकप्रतिनिधीं आग्रही राहावे,असे श्रीमती गो-हे यावेळी म्हणाल्या.

विरोधी पक्षनेता अंबादास दानवे म्हणाले की, संसदीय आयुधे शक्तिशाली असून लोकप्रतिनिधींनी त्याचा प्रभावीपणे जनसामान्यांच्या हितासाठी वापर केल्यास निश्चितच अधिक गतीने जनसामान्यांचे प्रश्न आपण व्यापक प्रमाणात सोडवू शकतो,हे लक्षात घेऊन सदस्यांनी जबाबदारीपूर्वक सर्व आयुधांची माहिती करुन घेत त्यांच्या सुयोग्य वापर करावा,असे सांगितले.

आमदार अनिल परब यावेळी म्हणाले की, एक चांगला आमदार म्हणून जनसामान्यांच्या प्रश्नांना पुरेपूर न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधींना असलेले विशेष अधिकार, संसदीय आयुधे सहायक ठरणारी आहे. त्यांची अधिकृत माहिती देणारी कृतिसत्रे, सभागृहाची कार्यपद्धती,अधिवेशनाचे कामकाजाची माहिती या सर्व गोष्टी निश्चितच उपयुक्त ठरणा-या आहेत.

कृतिसत्राच्या पहिल्या सत्रात मार्गदर्शन करताना विधीमंडळाचे सेवानिवृत्त सचिव अनंत कळसे म्हणाले की, विधान परिषद या वरिष्ठ सभागृहातील सदस्यसंख्या विधानसभेच्या तुलनेत अल्प असल्याने संसदीय आयुधाचा वापर अधिक प्रमाणात करणे शक्य असते. लक्षवेधी, तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न,अल्पसूचना,औचित्याचा मुद्दा, विशेष उल्लेख याची कार्यपद्धती,महत्व आणि प्रभाव याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.