मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.) : भाजप नेते राहुल कुल यांच्या मालकीच्या भीमा पाटस साखर कारखान्याच्या विरोधात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. या कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा राऊत यांचा आरोप आहे. यासंदर्भातील तक्रारीची प्रत त्यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केली आहे.
सीबीआयकडे केलेल्या तक्रारीत संजय राऊतांनी अनेक आरोप केले आहेत. भीमा पाटस साखर कारखान्यात मनी लॉन्ड्रिंग झालाच्या आरोप संजय राऊतांनी केला आहे. कारखान्याच्या खात्यात असलेले 500 कोटी रुपये कारखान्या व्यतिरिक्त बाहेरच्या कामांसाठी, खासगी कामांसाठी वापरल्याचा राऊतांचा आरोप आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करण्याची मागणीही संजय राऊतांनी सीबीआयकडे केली आहे. यापूर्वी पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी भीमा पाटस साखर कारखान्याविरोधात आरोप केले होते. तसेच, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र गृहमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सीबीआयकडे तक्रार दाखल केल्याचे संजय राऊतांचे म्हणणे आहे. संजय राऊतांनी त्यांच्याकडे असलेली सर्व माहिती सीबीआयला पुरवली असून यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दौंडचा भीमा पाटस सहकारी साखर कारखाना आणि दादा भुसेंचा गिरणा सहकारी साखर कारखान्याचे 1800 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण आहे. यावर सरकार कोणतीही कारवाई करत नाही. म्हणून मी राहुल कुल चेअरमन असलेल्या भीमा पाटस साखर कारखान्याचं प्रकरण सीबीआयकडे पाठवले आहे. मी वारंवार गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे या कारखान्याबाबत पत्रव्यवहार केला होता. पण त्यांनी याबाबत दुर्लक्ष केल्याचे राऊत म्हणाले. भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्यासाठी सीबीआयला मी पूर्ण सूट दिली असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते, म्हणून हे प्रकरण मी सीबीआयकडे पाठवले आहेत. सध्या राज्याचे गृहमंत्री याकडे लक्ष देत नसल्याचा त्यांचा आरोप आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply