नवी दिल्ली, 24 मार्च (हिं.स.) : केरळच्या वायनाड येथील काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सूरतच्या सत्र न्यायालयाने गुरुवारी 2 वर्षाची शिक्षा ठोठावली होती. दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी लोकप्रतिनिधींना शिक्षा झाल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होते. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने राहुल यांची खासदारकी आज, शुक्रवारी रद्द केलीय.
मानहानीच्या खटल्यात सूरतच्या जिल्हा कोर्टाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली असून त्यांना जामीनही मंजूर झाला आहे. पण 2 वर्षाची शिक्षा झाल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक प्रचारात 2019 मध्ये कर्नाटकात आयोजित सभेत राहुल गांधी यांनी “मोदी आडनावाचे सर्वजण चोर असतात” असे म्हंटले होते. राहुल गांधी यांच्या विधानामुळे संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणी कोर्टात केस दाखल केली होती. याप्रकरणी 4 वर्षे सुनावणी चालल्यानंतर सूरत सत्र न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर वरच्या कोर्टात जाण्यासाठी 30 दिवसांच्या मुदतीसह लगेच राहुल यांना जामीनही मंजूर करण्यात आला. परंतु, 2 वर्ष शिक्षा झाली असल्याने नियमानुसार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply