सिडनी, 24 मे (हिं.स.) : “परस्पर विश्वास आणि परस्पर आदर” हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील घनिष्ठ ऐतिहासिक संबंधांचा पाया असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे मंगळवारी भारतीय समुदायाबरोबर त्यांनी संवाद साधला. सिडनीमधील कुडोस बँक एरिना भागात झालेल्या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये भारतीय विद्यार्थी, संशोधक, व्यावसायिक आणि उद्योजक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. ऑस्ट्रेलियातील अनेक मंत्री, संसद सदस्य आणि इतर मान्यवरही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
ज्या भागामध्ये भारतीय मोठ्या संख्येने वास्तव्य करतात. त्या वेस्टर्न सिडनी येथील पॅरामटा येथील हॅरिस पार्कमध्ये उभारण्यात येणाऱ्या ‘लिटिल इंडिया गेटवे’ची दोन्ही पंतप्रधानांनी संयुक्तपणे पायाभरणी केली. दोन्ही देशांना जोडणाऱ्या असंख्य घटकांचा मोदी यांनी आवर्जुन उल्लेख केला. त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय समुदायाने दिलेल्या योगदानाचे आणि मिळवलेल्या यशाचे कौतुक केले आणि त्यांना भारताचे सांस्कृतिक ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ म्हटले.
पंतप्रधानांनी यावेळी जागतिक स्तरावर भारताचा वाढता दबदबा आणि संपूर्ण जगाला भारताच्या यशोगाथांमध्ये रस असल्याचे नमूद केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सखोल संबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला आणि ब्रिस्बेनमध्ये भारतीय दूतावास उघडण्यात येईल, अशी घोषणा केली.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply