नवी दिल्ली, 23 मार्च (हिं.स.) : दहशतवाद्यांचा बीमोड अखेर दहशतवादानेच होतो. जम्मू आणि काश्मीरचा असल्यामुळे ते खात्रीने सांगू शकतात की दहशतवादी पळून जात आहेत आणि दहशतवाद अंतिम टप्प्यात आला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले.
शहीद-ए-आझम भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी नवी दिल्ली येथे आयोजित “बसंती चोला दिवस” कार्यक्रमात बुधवारी ते बोलत होते. अंतर्गत विरोधामुळे अखेर भारतातून बाहेर पडावे लागल्याने ब्रिटीशांची दहशतवादी राजवट संपुष्टात आली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भगतसिंह हे 20 व्या शतकातील पहिले मानवाधिकार कार्यकर्ते होते, तेव्हा मानवी हक्कांची संकल्पना अस्तित्वात देखील आली नव्हती, ते काळाच्याही खूप पुढे होते, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. हुतात्मा आणि स्वातंत्र्यसैनिक याशिवाय भगतसिंह हे एक महान विचारवंत आणि तत्त्वज्ञ देखील होते आणि त्यांच्या लेखनात आणि विचारांमध्ये गांधी आणि कार्ल मार्क्स या दोघांचेही मिश्रण होते, असे त्यांनी सांगितले.
एसबीएस फाउंडेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहीद भगतसिंह सेवा दलाच्या योगदानाच्या सामाजिक कार्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी कौतुक केले. कोविड महामारीच्या काळात प्रत्यक्ष काम करताना दिसणारी एसबीएस ही एकमेव संस्था होती , हे त्यांनी अधोरेखित केले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply