नवी दिल्ली, 22 मार्च (हिं.स.) : सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून सभागृहात झालेला गोंधळ मिटवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी मंगळवारी राज्यसभेतल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची दोनदा बैठक घेतली.
सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे हे आपले कर्तव्य आहे, संसद लोकशाहीचे मर्म आहे आणि संसदेचे कामकाज सुरळीत चालावे, अशा जनतेच्या अपेक्षा असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. ही बैठक दीड तास चालली. सभागृह हे वादविवाद, संघर्ष आणि गतिरोधासाठी नाही तर सहकार्याने चर्चा करण्यासाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळी 11.30 वाजता पहिली बैठक झाली, या बैठकीला भाजप, वायएसआरसीपी, बीजेडी आणि टीडीपीचे नेते उपस्थित होते. मात्र इतर पक्षांचे नेते उपस्थित राहिले नाहीत. काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आणि द्रमुक पक्षाचे नेते बैठकीपूर्वी अध्यक्षांना स्वतंत्रपणे भेटले. अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीला आपण उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी अध्यक्षांना सांगितले. त्यांचे हे कृत्य लोकशाहीला मारक असून आपल्या भावना इतर नेत्यांपर्यंत पोहोचवा, असे अध्यक्षांनी या दोन्ही नेत्यांना सूचित केले.
पहिल्या बैठकीत भाजप, वायएसआरसीपी बीजेडी आणि टीडीपीचे नेते वगळता काँग्रेस, एआयटीएस, द्रमुक, आप,आरजेडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, संयुक्त जनता दल, अण्णा द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, टीआरएस, एजीपी आणि इतर नेत्यांची अनुपस्थिती होती. त्यानंतर, राज्यसभेच्या अध्यक्षांनी पहिल्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या पक्षांच्या नेत्यांना त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आणि दुपारी 2:30 वाजता दुसऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आणखी एक आवाहन केले.
दुसऱ्या बैठकीला राज्यसभेचे उपाध्यक्ष डॉ. हरिवंश, शरद पवार (राष्ट्रवादी), डॉ. केशव राव (टीआरएस), तिरुची शिवा (द्रमुक), डॉ. शांतनु सेन (टीएमसी), एम. थंबीदुराई (द्रमुक) सस्मित पात्रा (बीजेडी), जी के वासन (तमिळ मनिला काँग्रेस), बिरेंद्र प्रसाद बैश्य (एजीपी); केंद्रीय मंत्री आणि सभागृह नेते पीयूष गोयल, केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी, संसदीय कार्य आणि सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, परराष्ट्र आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन आणि भाजपचे मुख्य प्रतोद लक्ष्मीकांत वाजपेयी उपस्थित होते.
यावर आणखी विचारविनिमय करण्यासाठी अध्यक्षांनी पुढील बैठक 23 मार्च रोजी सकाळी 10 वाजता बोलावली आहे आणि सगळ्या नेत्यांना उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply