डोंबिवली,२२ मार्च (हिं.स.) : २५ व्या चैत्र पाडवा नववर्ष शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मनसे आमदार प्रमोद ( राजू) पाटील या त्रिमूर्तीसह सिनेकलाकरांची उपस्थिती डोंबिवलीत लक्षवेधी होती. भाजपा-शिवसेना-मनसे नेत्यांच्या उपस्थितीमुळे आता पुढील राजकीय वाटचाल एकत्रित होणार का अशी विचारणा डोंबिवलीकरांमध्ये होत होती. मात्र यावर्षी श्रीगणेश मंदिर संस्थान स्वागतयात्रा समितीचे नियोजन ढासळल्याने शोभयात्रेचा नूर पालटून गेला. कोणावरही नियंत्रण नसल्याने चक्क मुख्य वासपीठावरून आयोजकांना विनवण्या कराव्या लागल्या. कोणीही कोणाचे ऐकत नव्हते. ज्याला पाहिजे त्या पध्दतीने मजामस्ती चालली होती. ढोल पथकांनी संपूर्ण यात्रा आपल्या ताब्यात घेतल्याचे एक अनोखे रूप डोंबिवलीकरां नवे होते. गर्दीने चेंगराचेंगरीही झाली.
डोंबिवलीत प्रथम सुरू झालेल्या या स्वागतयात्रेचे यावर्षी २५ वे वर्ष होते. स्वागत यात्रेत अनेक चित्र रथांसह अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. यावेळी पर्यावरणीय रक्षण ,जल अभियान यासारख्या गोष्टींवर चित्र रथात अधिक लक्ष केंद्रित केले होते. वसुदेवम् कुटुंबकम् या संकल्पनेवर आधारित ही स्वागत यात्रा काढण्यात आली. मुख्यमंत्र्यांसह अनेक सिनेकलाकार या यात्रेत सहभागी झाले होते.भाजप माजी नगरसेवक शैलेश धात्रक व माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांनी डोंबिवली पश्चिमेला स्वागत यात्रेवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
दरवर्षी प्रमाणेच ढोल ताशा पथकाचा उत्साह शिगेला पोहचला होता. यावेळी जवळपास १५ ते २० पथके यामध्ये सहभागी झाली होती. अनेक पथकांमध्ये लहान मुलांचा देखील सहभाग बघायला मिळला. पारंपरिक वेशभूषा करून आलेल्या तरुणाईचा उत्साह शिगेला पोहचला होता. ढोल ताशाच्या गजरात तरुणाईचे पाय आपसूकच थिरकत होते. इतकेच नव्हे तर सर्वच तरुण सेल्फी काढण्यात दंग झाले होते.
आठ महिन्यात धाडसी निर्णय घेणारे देशातील हे पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्याच्या विकासाबरोबर सांस्कृतिक भूकही पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. याची सुरुवात डोंबिवलीतील झाल्याचा मला अभिमान आहे. फडके रोडवरील गणेश मंदिराचे हे १०० वे वर्ष असून गणपती मंदिरासाठी अपेक्षित असलेली सर्व मदत सरकारकडून केली जाईल असे त्यांनी जाहीर गेले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, संघाच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षापासून ही शोभयात्रा सुरू ठेवली आहे. हाच संकल्प पुढील येणाऱ्या पिढीने सुरू करणे आवश्यक आहे. मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील म्हणाले, यावर्षीचे शोभ यात्रा नियोजनात कमतरता दिसून आली. यावर पुढल्या वर्षी नियोजन योग्य रीतीने करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शोभा यात्रेचे स्वागत करण्यात आले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply