मुंबई, 20 मार्च (हिं.स.) : मराठी शाळांच्या अनास्थेचा मुद्दा विधानसभेत गाजला. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी औचित्याच्या मुद्दा उपस्थित केला. यातमुंबई महापालिका मराठी माध्यम शाळांसाठी एकूण ३,२१३ पदे मंजूर आहेत; मात्र त्यातील केवळ १,१५४ पदांवर शिक्षक कार्यरत असून २,०५९ शिक्षकांची पदे रिक्त आहेत, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबई येथील मराठी टक्का घसरण्यासाठी कोण जबाबदार आहे, याची चौकशी करावी, अशी त्यांनी मागणी केली.
अतुल भातखळकर म्हणाले की, जिथे मराठी शाळांमध्ये शिक्षकच नसतील, तिथे दर्जेदार शिक्षण तरी कसे मिळणार? हे मुंबई महापालिकेच्या लक्षात येत नाही का ? मराठी शाळांऐवजी इंग्रजी शाळा चालू केल्या जात आहेत. गुजराती माध्यमाच्या २३, तर हिंदी माध्यम शाळांमधील शिक्षकांचीही फक्त २६ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे फक्त इंग्रजीच नव्हे, तर गुजराती आणि हिंदी माध्यमच्या तुलनेत मुंबईत मराठी माध्यम शाळांना सावत्र वागणूक मिळत आहे. एकीकडे मराठी शाळांमधील ६४ टक्के पदे रिक्त असतांना महापालिकेच्या इंग्रजी शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदाचा आकडा फक्त १४ टक्के इतका आहे. परिणामी, मुंबईत मराठी टिकवण्यासाठी महापालिका प्रशासनास प्रत्येक राजकीय व्यक्तीसह मराठी मुंबईकराने जाब विचारण्याची आवश्यकता आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply