Political repercussions have emerged following the circulation of an alleged audio clip featuring Thane Municipal Corporation Assistant Commissioner Mahesh Aher, with supporters of Dr. Jitendra Awad reportedly beating Aher in front of his office.
ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर डॉ. जितेंद्र आव्हाड समर्थकांनी आहेर यांना त्यांच्या कार्यालयासमोर केलेल्या मारहाणीचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. “आहेर- आव्हाड” यांच्यातील ऑडिओ क्लिप संवादावरून सुरू झालेल्या वादाला गंभीर राजकीय वळण लागले आहे. या वादातून ठाण्यातील सत्ता वर्चस्वाची लढाई सुरू झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध डॉ. जितेंद्र आव्हाड “आमने- सामने’ आले आहेत. डॉ. जितेंद्र आव्हाड आणि वाद हे समीकरण काही सुटता सुटत नाही. कोणालाही कमी लेखण्याचा उद्दामपणा त्यांना नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकवून जातो. काही महिन्यांपूर्वी “हर हर महादेव” चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करताना आव्हाड यांनी एका तरुण प्रेक्षकाला मारहाण केली होती. या प्रकरणात त्यांना अटक झाली होती. त्यानंतर कळवा-ठाणे खाडी पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर एका महिलेला जाणीवपूर्वक धक्का देऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आव्हाड यांच्यावर अटकेची पाळी आली होती. त्याआधी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या इतिहासाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे आव्हाड अडचणीत आले होते. सोशल मीडियावर आव्हाड यांच्याविषयी काही आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे अनंत करमुसे यांना मारहाण केल्याप्रकरणी डॉ. जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली होती.
आता ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यामुळे पुन्हा एकदा आव्हाड वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी महेश आहेर यांच्या भ्रष्टाचाराबद्दल ट्विटरवर व्हिडीओ टाकला होता. त्यानंतर या वादाची सुरुवात झाली. पाठोपाठ आहेर यांची एक कथित ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली. त्यात डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे जावई आणि त्यांच्या वडिलांना “बाबाजी” नावाच्या अंडरवर्ल्ड गुंडाकडून जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा संवाद आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज हा महेश आहेर यांचाच असल्याचा आरोप आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड यांनी केलेला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे. मुळात ही ऑडिओ क्लिपच आव्हाड आणि आहेर यांच्यातील वादाचे प्रमुख कारण ठरलेली आहे. काल बुधवारी ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताच संतप्त झालेल्या आव्हाड समर्थक कार्यकर्त्यांनी महेश आहेर यांना ठाणे महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गाठून त्यांच्यावर हल्ला चढविला. महापालिकेचे सुरक्षारक्षक आणि आहेर यांच्या पोलीस अंगरक्षकासमोर आव्हाड समर्थकांनी आहेर यांना जबर मारहाण केली. त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. मारहाणीनंतर आहेर यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऑडिओ क्लिपमधील आवाज हा माझा नसून मला अडकविण्यासाठी ही क्लिप तयार करण्यात आल्याचा आरोप आहेर यांनी केला आहे. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आता त्यांच्या ट्विटर हँडलवर ठाणे महापालिकेतील अवैध बांधकामाचा भ्रष्टाचार उघड करणारी आणखी एका मोठ्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप टाकलेली आहे. त्यामुळे आहेर यांना मारहाण करण्यावरून सुरू झालेल्या या वादाला गंभीर राजकीय वळण लागले आहे. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीने आहेर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे ठाण्यातील वर्चस्वासाठी एकनाथ शिंदे विरुद्ध डॉ. जितेंद्र आव्हाड अशी थेट लढाई सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मध्यरात्री ज्युपिटर रुग्णालयात भेट देऊन आहेर यांच्या प्रकृतीची चौकशी केल्यामुळे आहेर यांना मुख्यमंत्र्यांचे अभय असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, या वादावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायद्याच्या राज्यात कोणालाही पाठिशी घालणार नसल्याचे सांगितले. ऑडिओ क्लिपमधील अधिकाऱ्याच्या आवाजाची तपासणी केली जाईल,असेही ते म्हणाले आहेत. डॉ. जितेंद्र आव्हाड असो वा अन्य कोणीही नेता त्यांना संपूर्ण सरंक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. या सम्पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Leave a Reply