जलजीवन मिशन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे.ती यशस्वी आणि जनतेच्या फायद्याची ठरली पाहिजे.भविष्यात गाव पाणी टंचाई पासून मुक्त झाले पाहिजेत, त्यासाठी या योजनेचे काम दर्जेदार झालेच पाहिजे. वापरण्यात येणारे पाईप योग्य दर्जाचे आहेत का ? याची खात्री करा. केवळ कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्षात पाईपची व इतर साहित्यांची क्वालीटी पहा. साहित्य व कमाच्या दर्जात तडजोड होता कामा नये, मी ती खपवुन घेणार नाही.अशा स्पष्ट सूचना आमदार नितेश राणे यांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ग्रामिण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता,उप अभियंता, शाखा अभियंता यांना दिल्या.
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी कणकवली प्रहार भवन येथे आढावा बैठक घेतली.यावेळी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसहीत तीनही तालुक्यातील पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, नाबार्डचे अधिकारी उपस्थित होते.
कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघात जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे २१३ कोटींची कामे सुरू आहेत. प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेली ही महत्वाकांक्षी योजना असून या योजनेचे काम दर्जेदारच झाले पाहिजे. कोणत्याही स्थितीत कामात तडजोड वा निकृष्ट काम झालेले खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे ही कामे करताना सर्व अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालावे. तसेच कामे वेळेत पुर्ण करण्यासही प्राधान्य द्या, असे सांगतानाच आपणही स्वतः याबाबत लक्ष ठेऊन आढावा घेणार असल्याचे आमदार नितेश राणे स्पष्ट केले.
यावेळी श्री. राणे यांनी प्रत्येक तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामाचा आढावा घेतला. कणकवली तालुक्यात १०२, देवगड तालुक्यात ७६ तर वैभववाडी तालुक्यात ५१ नळयोजनांची कामे या जनजीवन मिशनअंतर्गत सुरू आहेत. या सर्व कामांवर एकूण २१३ कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यामुळे या योजनेच्या उद्देशानुसार प्रत्येक घरापर्यंत पाणी योग्य प्रमाणात पोहाचलेच पाहिजे, तसेच कोणत्याही स्थितीत कामाचे साहित्य व दर्जात तडजोड होता कामा नये, अशा स्पष्ट सूचना श्री. राणे यांनी दिल्या.
जलजीवन मिशन ही प्रधानमंत्र्यांनी जाहिर केलेली महत्वाकांक्षी योजना असून दर तीन महिन्यांनी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी याचा आढावा घेत असतात. या योजनेच्या सुपरव्हिजेनचे काम नाबार्ड व एनजीएस या संस्थाना दिलेले आहे. योजनेचे प्रत्येक काम दर्जेदार होतानाच ते वेळेत पुर्ण करण्यास प्राधान्य द्या, असे श्री. राणे म्हणाले. या योजनेसाठी पाणीपुरवठा योजनांची कामे केलेले ठेकेदार असण्याची गरज आहे. मात्र, आपल्याकडे अशी कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांना देण्यात आलेली आहेत. ज्या ठेकेदारांना ही कामे दिलेली आहेत, त्यांची यापूर्वीची रस्त्यांची कामे तपासा. त्यांच्याकडून रस्त्यांची कामे दर्जेदार झालेली नसतील तर या कामांबाबतचा दर्जा ते कसा राखणार? असा सवालही श्री. राणे यांनी केला. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत ब्लॅकलिस्टमध्ये असलेल्या कुणा ठेकेदारांना काम दिलेले आहे का ते पहा. कामाच्या दर्जाबाबत आपण कोणत्याही स्थितीत तडजोड सहन करणार नाही, असा इशाराही श्री. राणे यांनी दिला.
या साऱ्यासाठी अधिकाऱ्यांसोबत आपण व्हॉटसप ग्रुपही तयार करत असून त्यावर तक्रारी, माहिती, कामाचा आढावाही घेण्यात येणार आहे. कोणत्याही स्थितीत या योजनेचे प्रत्येक काम दर्जेदारच झाले पाहिजे, याकडे सर्व अधिकाऱ्यांनी जातीनिशी लक्ष द्या, अशा सूचनाही श्री. राणे यांनी दिल्या
Leave a Reply