नवी दिल्ली, 18 एप्रिल (हिं.स.) : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आयएनएक्स मनी लाँड्रिग प्रकरणी कार्ती चिदंबरम यांची 11.04 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने यासंदर्भात निवेदन जारी करत माहिती दिली आहे.
ईडीच्या निवेदनात नमूद केल्यानुसार कार्ती चिदंबरम यांच्या 4 संलग्न मालमत्तांपैकी एक ही कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात असलेली स्थावर मालमत्ता आहे. यासोबतच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ऍक्ट (पीएमएलए) अंतर्गत कार्ती यांच्या विरोधात अंतरिम आदेशही जारी करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम हे तामिळनाडूमधील शिवगंगई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. सध्या ते आयएनएक्स प्रकरणात तुरुंगात आहे. त्यांना सीबीआय आणि ईडी या दोघांनी अटक केली होती. हे प्रकरण आयएनएक्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मिळालेल्या कथित अवैध पैशाशी संबंधित आहे. यूपीए सरकारमध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना त्यांच्या वडिलांच्या कार्यकाळात परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (एफआयपीबी) याला मान्यता दिली होती. दरम्यान, ईडीने काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम आणि इतरांविरुद्ध 2011 मध्ये 263 चिनी नागरिकांना व्हिसा जारी करण्यात कथित अनियमिततेच्या संदर्भात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply