मुंबई, 18 मे (हिं.स.) : सध्या सर्वच पक्ष परिवारवादी आहेत. ज्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे नियत नाही. ज्यांच्याकडे नियत आहे, त्यांच्याकडे ताकद नाही, अशी देशभरातील राजकीय पक्षांची स्थिती आहे. मात्र भाजप हा एकमेव पक्ष असा आहे. आपल्याकडे नेता आहे, नीती आहे आणि नियती आहे. बाकी सर्व पक्ष परिवार वादासाठी काम करत आहेत, तर भाजपा विकासवादासाठी काम करतो आहे, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केले.
नड्डा हे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्या दरम्यान ते बुधवारी मुंबईत बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, महाराष्ट्र प्रभारी सिटी रवी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार असताना प्रत्येक विकास कामांमध्ये आडकाठी आणण्याचे काम करण्यात येत होते, मात्र आता शिंदे -फडणवीस सरकारमुळे विकासाला गती मिळाली असून या डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्रात परिवर्तन होते आहे. आज भाजपामध्ये काम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते हे अत्यंत भाग्यवान आणि नशीबवान आहेत कारण भाजपा हा आज जगातील सर्वांत मोठा पक्ष आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे जगविख्यात नेतृत्व आज आपल्या पक्षाकडे आहे. आज देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे आणि 2047 पर्यंत आपला देश आपणाला एक विकसित देश म्हणून पुढे आणायचा आहे. अशा अत्यंत अमृत काळामध्ये आपण सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून काम करत आहोत. ज्या क्षणांची इतिहासात नोंद होईल अशा कालखंडाचे आपण साक्षीदार आहोत. विलेपार्ले येथे मुंबईतील पक्षाच्या मोर्चा, आघाडी प्रमुखांशी संवाद साधला.
यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, गेल्या महापालिका निवडणुकीत आपली सगळ्यांची जी इच्छा अपूर्ण राहीली ती पुर्ण करण्याची संधी आता येणाऱ्या पालिका निवडणूकीत आपल्याला मिळणार असून त्याच्यासाठी सगळ्यांंनी एकजूटीने कामाला लागू या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात मेट्रो बुलेट ट्रेन यासारखे महत्त्वाचे प्रकल्प रखडवण्यात आले, अडवण्यात आले यांच्या वसुलीच्या अनेक कहाण्या सगळ्यांनाच माहित आहेत. त्यामुळे आता जेव्हा केव्हा मुंबई महापालिकेच्या निवडणुका होतील. त्यावेळी मुंबई महापालिकेची तिजोरी आपणाला मुंबईकरांच्या हाती द्यायची आहे. त्याची होणारी लूट थांबवायची आहे, मुंबई महापालिकेवर महापौर कोणाचा होणार हा महत्त्वाचा मुद्दा नाही, मुंबई महापालिका आता आपणाला मुंबईकरांच्या हाती द्यायचे आहे,.असे आवाहन त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply