नाशिक , 17 मे (हिं.स.) : नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तेथील उपस्थित मद्यपी तरुणांनी मारहाण केली. या घटनेत पत्रकार गंभीर जखमी झाले आहे. गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात हे अनुचित प्रकार घडत असल्याने तिच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करून तिला नाशिक जिल्हा बंदी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पोलीस आयुक्त अकुंश शिंदे यांच्याकडे केली आहे.
नृत्यांगना गौतमी पाटील ही आपल्या नृत्यामुळे व अश्लील हावभाव मुळे अल्प कालावधीतच प्रकाशझोतात आली आहे. ती आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याने अनेक टवाळखोर, उपद्रवी मनोवृत्तीचे तसेच मद्यपी तिच्या कार्यक्रमात हजेरी लावतात. अनेक उपद्रवी एकत्र आल्यानंतर साहजिकच धूडगूस होतोच व कार्यक्रमात मोठा गोंधळ होऊन पोलीस कर्मचाऱ्यांना लाठीमार करावा लागतो. अहमदनगर, पुणे, सांगली, छ.संभाजी नगर, बार्शी आणि नाशिक या सर्वच शहरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात काहींना काही वाद झाल्याचे निदर्शनास आले आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी देखील वाढली आहे.
नृत्य कलाकार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे नाशिक शहरात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना येथील मद्यपी कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यामध्ये पत्रकारांना गंभीर दुखापत झाली. सदरची घटना गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरु असताना घडली. गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात असेच गंभीर हाणामारीचे प्रकार घडत असतात. या घटनेसाठी सर्वस्वी गौतमी पाटीलला जबाबदार धरून तिच्यावर व आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच नाशिकमध्ये असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी नाशिक जिल्ह्यात गौतमी पाटीलला पूर्णतः बंदी घालण्यात यावी अशी मागणी पत्रात केली आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply