अमरावती, 16 मे, (हिं.स.) स्वच्छता सर्वेक्षणांत तसेच मानांकनात अमरावती महानगर पालिकेला विविध पुरस्कार मिळत असल्याचा गाजावाजा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र शहरात कुठेही साफसफाई व स्वच्छता असल्याचे दिसत नाही.सद्यस्थितीत साफसफाई कंत्राटा बद्दल नवीन निविदा प्रक्रिया राबविल्यामुळे शहरात साफसफाईचा पूर्णता बोजबारा उडालेला आहे. महापालिकेने साफसफाई बाबत नव्याने परिपूर्ण धोरण राबविणे गरजेचे असल्याने यासंदर्भात शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आक्रमक पवित्रा घेत महापालिकेवर धडक दिली .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांनी निवेदनातून मनपा प्रशासनाला अवगत केले की, सद्या महापालिकेकडे साफसफाईला घेऊन कोणतेही धोरण नसल्याने शहर स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहे. ज्याठिकाणी कचरा कंटेनर ठेवण्यात आले आहेत . त्या जागांवर कंटेंनरच्या बाहेर कचरा पडला जातो. तो नियमित कचरा देखील उचलला जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कंटेनरचे स्पॉट खुल्या जागांवर असल्याने पावसाचे दिवसात तेथून अवागमन करणे सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक झाले आहे. त्याकरीता कंटेनर ठेवलेल्या जागांवर काँक्रीटचा प्लॅटफार्म तयार करण्याची मागणी यापूर्वी निवेदनातून करण्यात आली होती. परंतु त्याकडे प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. आगामी पावसाळा लक्षात घेता शहरातील साफसफाईला घेऊन महापालिकेने योग्य धोरण व नियोजन करणे आवश्यक आहे. काही व्यावसायिक , हॉकर्स हे कचरा रस्त्याच्या कडेला टाकतात . त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची यंत्रणा सुद्धा कार्यरत करणे आवश्यक आहे. असे प्रशांत डवरे यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे.
तसेच स्वच्छता कामांना अधिक प्रोत्साहित करण्यासाठी संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान पुरस्कार दरवर्षी देण्यात यावा. अशी मागणी सुद्धा निवेदनातून केली आहे. यासंदर्भात अमरावती महानगर पालिकेच्या सर्व साधारण सभा १८-०२-२०२० मध्ये प्रस्ताव आणून पारित करण्यात आला होता. परंतु त्यावर सुद्धा महापालिका प्रशासनाने अद्यापही कारवाई केली नसल्याने शहराची साफसफाईला घेऊन जागृती व उपाययोजना होतांना दिसत नाही. असे झाल्यास शहराला मिळालेला स्वच्छ शहर पुरस्काराचे आपण सर्व खरे मानकरी ठरू असे सुद्धा निवेदनातून सांगण्यात आले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply