मुंबई, 14 मे (हिं.स.) : उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगिती करण्यात आलेली महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार असल्याची चर्चा आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भविष्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि इतर घटक पक्ष बसून जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहोत. याशिवाय महाविकास आघाडीचे एकत्रित संघटन व ठाम पर्याय महाराष्ट्राला सक्षमपणे देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा असणार आहे यावर एकमत आजच्या बैठकीत झाल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरुन अधिक मोठ्या संख्येने आणि ताकदीने महाविकास आघाडी पुढच्या काळात काम करेल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
सुप्रीम कोर्टात जो निर्णय झाला त्याचा तपशील आपण वाचला आहे. सुप्रीम कोर्टाने मर्यादा घालून विधानसभा अध्यक्षाना निर्णय घेण्याची जबाबदारी दिली आहे. लवकरात लवकर निर्णय द्यावा असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. त्यादृष्टीने विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply