रत्नागिरी, 14 मे, (हिं. स.) : रत्नागिरी शहरात मुख्य रस्त्यांवर तीन ठिकाणी वर्दळीमुळे अपघातांची जास्त शक्यता असल्याने तेथे गतिरोधक व्हावेत, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे शहरात मुख्य रस्त्यांवर रंबरल स्ट्रीप आणि पांढरे पट्टे रंगविले जात आहेत.
डिसेंबर २०२२ मध्ये प्रवीण देसाई यांनी रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे याबाबतची मागणी केली होती. पादचारी आणि वाहनचालक नागरिकांच्या सुरक्षेसाठी गतिरोधक असण्याची गरज त्यांनी पत्रात मांडली होती. याबाबत त्यांनी भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, पोलीस अधीक्षक यांनाही पत्र पाठवले होते.
रत्नागिरी शहराला जोडणारा मुख्य रस्ता साळवी स्टॉपपासून सुरू होतो. या प्रमुख मार्गावर तीन जास्त वर्दळीची ठिकाणे आहेत. शिवाजीनगर उतार, शिवाजीनगर येथे हिंद सायकल मार्टशेजारी आणि आरोग्य मंदिर या ठिकाणी शाळेतील मुले, ज्येष्ठ नागरिक यांची वर्दळ जास्त प्रमाणात असते. त्यामुळे तेथे रस्ता पार करताना खूपच धावपळ उडते आणि येथे अपघात होऊ शकतो. यामुळे गतिरोधकांची गरज प्रवीण देसाई यांनी मांडली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत यावर निर्णय घेऊन रंबलर स्ट्रीप आणि पांढरे पट्टे मारण्याच्या कामाला काही दिवसांपूर्वी प्रारंभ झाला. यामुळे रस्ता ओलांडताना ज्येष्ठ नागरिक, मुले, महिलांना सोयीचे होणार आहे. आरोग्य मंदिर येथे रबर मोल्डेड स्पीड ब्रेकर व्हावा यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. वाहनचालक तसेच पादचाऱ्यांनी नीट सांभाळूनच रस्ता ओलांडावा, असे जनहिताचे आवाहन त्यांनी केले आहे.
Leave a Reply