बुलडाणा, 13 मे (हिं.स.) : महाराष्ट्र संतांची भूमी आहे. समाजप्रबोधन तसेच लोकांचे जीवन प्रकाशमान करण्याचे काम संत विचारांनी केले आहे. याच विचारांचा वसा घेऊन शासन वाटचाल करीत आहे. इसरूळ येथील श्री संत चोखोबारायांचे मंदिर आणि ही भूमी तीर्थस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
संत चोखोबारायांची जन्मभूमी असलेल्या मेहुणा राजानजिकच्या चिखली तालुक्यातील इसरूळ येथे संत चोखोबारायांच्या मंदिराचा कलशारोहण व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी रोहयो मंत्री संदिपान भुमरे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, नारायण कुचे, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, गोपिकिसन बाजोरीया, हरिभाऊ बागडे, विजय जगताप, हभप पुरूषोत्तम महाराज पाटील, श्री पाटणकर महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, आध्यात्मिक परंपरेचे स्थान राजकीय व इतर क्षेत्राहून वरचे आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पंढरपूर येथे आषाढी एकादशीची पूजा करण्याचे भाग्य लाभले. वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचे भूषण आहे. हभप पुरूषोत्तम महाराज पाटील यांच्यात प्रयत्नातून चोखोबारायांचे मंदिर साकारले गेले आहे आणि हा परिसर तीर्थस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उभारण्यात येतील. हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांचेही वारकरी संप्रदायावर खूप प्रेम होते. लाखो भाविक पायी वारी करून पंढरपूरला जातात. त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. संत विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी संत विद्यापिठाची उभारणी करण्यात येणार आहे.
संतांच्या सानिध्याने शांती आणि समाधान लाभते. वारकरी हे महाराष्ट्राचे भूषण आहे. त्यांचा सहवास जीवनातील अंधार दूर करणारा असतो. वारकरी संप्रदाय समाजात समानता राखण्याचे काम करतो. त्यामुळे त्यांच्यापासून चांगले काम करण्याची प्रेम, उर्जा मिळते. त्यांच्या प्रेरणेतून समाजासाठी झटण्याचे बळ मिळते. चोखोबारायांचे चांगले मंदिर उभे राहिले आहे. या मंदिराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
इसरूळ येथील कार्यातून संत परंपरेचे प्रतिक, पावित्र्य पहायला मिळाले. येथे होत असलेले कार्य पाहून आनंद वाटला. संत परंपरेचा अनमोल ठेवा यातून जपला जाणार आहे. संत साहित्याचा अभ्यास आणि चिकित्सा होणे गरजेचे आहे. नव्या विचारांनुसार अभंग, भारूडाचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संत विद्यापीठ उपयुक्त ठरेल. संत परंपरा भक्ती, सहनशक्ती, संयम, विवेक आदी गुणांची प्रेरणा देते. त्याचे विचारांचे वसा जोपासत कष्टकऱ्यांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी अनेक लोकहिताचे निर्णय राज्य शासनाने घेतले आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी हभप ज्ञानेश्वर महाराज पठाडे, पंकज महाराज गावंडे यांच्यासह हजारो वारकरी उपस्थित होते. कार्यक्रमात सुरवातीला शिंदे यांना संत चोखोबारायांची प्रतिमा भेट दिली.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply