अकोला, १३ मार्च : भाजपने भ्रष्टाचार केल्याने रस्ता मरण पावला असा आरोप करीत आज रस्त्याच्या निधनावर वंचित बहुजन युवा आघाडीने शोकसभा घेत अनोखे आंदोलन करण्यात आले. ३१ मार्च पर्यंत अर्धवट रस्ता पूर्ण न झाल्यास या रस्त्याचे श्राद्ध घालणार असल्याचा इशारा देण्यात आला. वंचित बहूजन युवा आघाडी अकोला महानगर पूर्व आणि पश्चिम च्या वतीने गौरक्षण संस्थाच्या बाजूला असलेला रोड एका वर्षात मरण पावल्याने ह्या मेलेल्या रस्त्यासाठी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या अध्यक्षतेखाली “श्रद्धांजली सभा” आयोजित करण्यात आली होती.
वंचित बहूजन अकोला पूर्व पश्चिम युवा आघाडी कार्यकर्ते पांढरे कपडे घालून मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. ७०० फुटाच्या रस्त्यावर ५९० खड्डे मोजून त्यांना चुन्याचे मार्किंग करण्यात आले. त्यानंतर अकाली मरण पावलेल्या या रस्त्याला सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. ३१ मार्च २०२३ पर्यंत हा रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ण न झाल्यास गौरक्षण रस्त्यासाठी श्राध्द घालण्याचा कार्यक्रम पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निमंत्रित करून आयोजित करू असा इशारा देखील देण्यात आला. आजच्या शोकसभेला शोकाकुल जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महानगराध्यक्ष जय तायडे आशिष मांगुळकरआदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply