लखनौ, 12 एप्रिल (हिं.स.) : हवामान बदलाची समस्या अमेरिका युरोप किंवा चीन नव्हे तर “वसुधैव कुटुंबकम” हा भाव जोपासणारा भारतच ही समस्या सोडवेल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच लखनऊ येथे केले. ग्लोबल वॉर्मिंग ही जागतिक समस्या बनली असून पर्यावरण संरक्षण आणि वनसंपदा टिकविण्यासाठी व्यापक जागतिक जनसहभाग आवश्यक आहे असेही ते म्हणाले. उत्तर प्रदेशच्या भूमीतच या प्रश्नांची उत्तरे मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उत्तर प्रदेशात लखनऊ येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय हवामान संरक्षण परिषदेत ‘विधिमंडळांची हवामान संरक्षणातील भूमिका’ या विषयावरील तांत्रिक सत्राचे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
उत्तर प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष सतीश महाना, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी चौबे, उत्तर प्रदेशचे वन व पर्यावरण मंत्री डॉ. अरुण कुमार, उत्तराखंडचे वन व पर्यावरण मंत्री सुबोध उनियाल, उत्तर प्रदेशचे वन व पर्यावरण राज्यमंत्री के.पी. मलिक, उत्तर प्रदेश वन व पर्यावरण विभाग प्रमुख मनोज सिंग, वन विभाग प्रमुख ममता संजीव दुबे, वन व पर्यावरण विभागाचे सचिव आशिष तिवारी यावेळी मंचावर उपस्थित होते.
सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, या तीन दिवसीय परिषदेत फक्त चिंतन करून चालणार नाही तर त्या चिंतनाचे जनसहभागात रुपांतर करावे लागेल. महाराष्ट्रात मी वनमंत्री असताना ५० कोटी वृक्ष लागवड करुन ते सिद्ध करुन दाखविले आहे. पर्यावरण संरक्षण , वन्य जीवनाचे संवर्धन आणि कांदळवन वृद्धी या बाबींना आता आपण गांभीर्याने विचार करुन महत्व दिले पाहिजे. विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासाठी विशेष तरतूद केल्याचा उल्लेख मुनगंटीवार यांनी केला.महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ असल्याचा उल्लेख त्यांनी अभिमानाने केला. सरकार पेक्षा स्वतः प्रत्येकाने जबाबदारी म्हणून यासाठी पुढे यावे असे आवाहन करतानाच संविधानातील हक्क शोधत असताना जबाबदारीकडे आपण दुर्लक्ष करतो याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.
वनविभागाचे महत्त्व जाणा
सरकारमध्ये वनमंत्री शेवटच्या पाचमध्ये मोजला जायचा. मी मंत्री झालो तेव्हा वनखात्याचे आणि वनमंत्र्यांचे महत्त्व समजावून सांगितले. कारण ज्या अॉक्सीजनच्या जोरावर इतर विभाग चालतात त्यांना अॉक्सीजन देण्याचं काम वनखाते करते. पर्यावरण रक्षणाचं काम वनखात्याच्याच माध्यमातून होतं, असे मुनगंटीवार म्हणाले. महाराष्ट्र सरकारचे वनखात्याचे बजेट २०१४ मध्ये २६५ कोटी रुपये होते, ते आज २ हजार ७०० कोटी रुपये आहे, असेही त्यांनी सांगितले.
टाळ्या थांबत नव्हत्या
सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणाची ओघवती शैली महाराष्ट्रात तर साऱ्यांनाच आकर्षित करते; उत्तर प्रदेशमधील लखनऊ शहरातील श्रोतेही आज त्यांच्या भाषण शैलीने प्रभावित झाले. भाषण सुरू झाल्यापासून अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर श्रोते टाळ्या वाजवून दाद देत होते. तर भाषण संपल्यावर बराच वेळ श्रोते टाळ्या वाजवत राहिले. टाळ्या थांबत नसल्यामुळे निवेदिकेलाही काही मिनिटे थांबावे लागले.
राममंदिरातील मूर्तीची प्रतिकृती भेट
राष्ट्रीय जलवायू परिषदेत सहभागी झाल्याबद्दल उत्तर प्रदेशचे वन व पर्यावरण मंत्री डॉ. अरुण कुमार सक्सेना यांनी महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अयोध्येच्या रामंदिरातील मूर्तीची प्रतिकृती भेट दिली. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण व विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री योगेंद्र उपाध्याय यांनी लखनऊ विमानतळावर सुधीर मुनगंटीवार यांचे श्रीरामाची मूर्ती देऊन स्वागत केले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply