नागपूर, 11 एप्रिल (हिं.स.) : सामाजिक सौहार्द बिघडवण्याच्या हेतूने असामाजिकतत्त्वांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने सोशल मिडीयात बोगस पत्रक व्हायरल केलेय. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सदर पत्र बनावट असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी यासंदर्भात मंगळवारी ट्विट करत माहिती दिली.
सोशल मिडायात गेल्या काही दिवसांपासून हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करणारे एक पत्रक व्हायरल होतेय. विशेष म्हणजे हुबेहुब संघाच्या लेटरहेड प्रमाणे बनावट लेटरहेड तयार करून ऐन रमजानच्या महिन्यात हे पत्रक काढण्यात आले. बनावट पत्रकात नमूद केल्यानुसार ‘’जसं की तुम्ही सर्वजण जाणता, आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी दरवर्षी दहा लाख मुस्लीम तरुणींना परत आणण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. ज्या अंतर्गत सर्व हिंदू मुलं जास्तीत जास्त इस्लाममधून धर्मांतरण करून हिंदू धर्मात आणण्यासाठी काम करतील. ज्यासाठी तुम्हा सर्वांना १५ दिवसांचं प्रशिक्षिण दिलं जाईल. ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल, की मुस्लीम मुलींना त्यांच्या धर्मातून कसे सोडवले जाईल आणि हिंदू धर्मात घरवापसी कशी करता येईल ?’’ असे सुरूवातीस म्हटले आहे.
याशिवाय ‘’आपला उद्देश केवळ मुस्लीम मुलींना हिंदू धर्मात आणणे आहे. कारण, एक मुलगी येणाऱ्या पिढीला हिंदू बनवू शकते. एक मुस्लीम मुलगी मुस्लीम मुलांना जन्म देते, आणि ती जेव्हा हिंदू धर्मात परिवर्तित होते तर तिने जन्म दिलेले प्रत्येक मूल हे हिंदू असेल. खाली काही मुद्दे दिले आहेत, ज्याद्वारे तुम्ही एखाद्या मुस्लीम मुलीस इस्लाम सोडण्यास मजबूर करू शकतात.’’असंही पत्रकात नमूद असून खाली काही मुद्दे देण्यात आले आहेत. हे पत्रक पूर्णपणे खोटे असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात ट्विटरवर जारी केलेल्या संदेशात सुनील आंबेकर म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने सोशल मीडियावर फिरणारे हे पत्रक पूर्णपणे खोटे आहे. यासोबतच अंबेकर यांनी ते खोटे पत्रक जनतेच्या माहितीसाठी ट्वीट करत देशवासियांना सावध केले आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply