अमरावती, 9 एप्रिल, (हिं.स.) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दरवर्षी यंत्रणेत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक पुरस्कार दिले जातात. याशिवाय अन्य कार्यक्रमही राबविण्याचे शासनाचे आदेश आहेत. असे असताना जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका पुरस्कार व अन्य पुरस्कार, लोकसंख्या दिन, आशा डे, अशा विविध उपक्रमांचाच विसर पडला आहे. गत दोन ते तीन वर्षांपासून यापैकी एकही कार्यक्रम संबंधित विभागाकडून राबविण्यात आला नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी निधी दिला जातो. तरीही असे उपक्रम का राबविले जात नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आरोग्य विभागाद्वारे कर्मचारी तसेच लोकसहभाग वाढविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य व नागरिक यांना एकत्रितरीत्या सहभागी करून घेण्याकरिता विविध कार्यक्रम पुरस्कार दिले.जातात; परंतु, जिल्हा परिषदेतील आरोग्य यंत्रणेकडून गत दोन वर्षांपासून हेल्थ मेळावा, जिल्हास्तरावरील आशा पुरस्कार, नाइटएजल पुरस्कार, लोकसंख्या दिवस, आशा डे तसेच आरोग्य दिन साजरा करण्याचा गत काही वर्षांपासून विसर पडला आहे. विशेष म्हणजे, या सर्व उपक्रमांकरिता शासनाकडून अनुदान दिले जाते. तरीही संबंधित विभागाचे खातेप्रमुखाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. सध्या मिनीमंत्रालयाच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला असल्यामुळे वरील उपक्रम कागदावरच राबवित नाहीत ना, असा सुरू उमटू लागला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत आशा डेकरिता २५ हजार रुपयांचे अनुदान आहे. असे असताना तालुका व मुख्यालयातील कार्यालयात आमंत्रित करून कौतुक व चहापानावर कार्यक्रम आटोपते घेतात की काय, अशी चर्चा आरोग्य यंत्रणेत होत आहे. किमान कर्मचारी प्रोत्साहन वाढविण्याकरिता तरी पुरस्कार घ्यावे, असे कर्मचारी खासगीत सांगतात. या पुरस्कार व कार्यक्रमाद्वारे गावातील लोकांचा सहभाग आरोग्यात वाढविणे नवीन कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्याकरिता हे पुरस्कार द्यावे, असे शासनाचे धोरण आहे. मात्र, कर्मचाऱ्यांवरील कौतुकाची थाप पडत नसल्याने निराशा होत नसल्याचे आरोग्य विभागात बोलले जात आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत राबविण्यात येणारे वरील सर्व उपक्रमाची अंमलबजावणी प्रशासकीय यंत्रणेकडून होणार का असा प्रश्न यानिमित्याने उपस्थित होत आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply