नवी दिल्ली, 8 मे (हिं.स.) : सहाव्या भारत कॅनडा व्यापार आणि गुंतवणूक विषयक चर्चेत केंद्रीय व्यापार आणि वाणिज्य तसेच ग्राहक व्यवहार, खाद्यपदार्थ आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय व्यापार, निर्यात प्रोत्साहन, लघुउद्योग आणि आर्थिक विकास मंत्री मेरी एनजी यांच्यासोबत सहभागी होणार आहेत. ही चर्चा आज कॅनडाची राजधानी ओटावा इथं होणार आहे. व्यापार आणि गुंतवणूकविषयक मंत्रीस्तरीय संवाद (एमडीटीआय) ही संबंधित विषयांच्या विस्तृत अशा व्याप्तीवर तसेच सहकार्याच्या क्षेत्रांवर चर्चा करण्यासाठी द्विपक्षीय यंत्रणा आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय व्यापारी संबंध मजबूत करणे, गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि सहकार्य, महत्वपूर्ण खनिजांच्या हरित संक्रमणा बाबत चर्चा आणि नव्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा ज्यात व्यवसाय ते व्यवसाय (बीटुबी) व्यापारांना प्रोत्साहन देणे आदि संकल्पनांवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल.
यावेळी उभय मंत्री भारत कॅनडा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासंबंधी वाटाघाटींचाही आढावा घेतील. मार्च 2022 मध्ये झालेल्या अखेरच्या एमडीटीआयच्या बैठकीत, दोन्ही मंत्र्यांनी अंतरीम करार अथवा प्रारंभिक व्यापारी करार म्हणजे इपीटीए करण्याच्या शक्यतेवर वाटाघाटी सुरू केल्या होत्या. त्यानंतर, वाटाघाटींच्या सात फेऱ्या पार पडल्या आहेत. 9 आणि 10 मे 2023 रोजी मंत्री गोयल हे टोरंटोला भेट देतील. तेथे ते व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठीच्या विविध बैठकांत भाग घेतील. यात प्रमुख कॅनडियन कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारीयांच्या समवेत बैठका, भारत आणि कॅनडातील सीईओंची गोलमेज परिषद, कॅनडात स्थित असलेल्या अनेक भारतीय आणि कॅनडीयन कंपन्यांशी संवाद साधणे आणि वित्तीय क्षेत्रातील गोलमेज परिषदेला उपस्थित रहाणे यांचा समावेश आहे. फिक्कीच्या नेतृत्वाखाली भारतीय सीईओंचे शिष्टमंडळ मंत्री गोयल यांच्यासमवेत असेल.
एसआयएएल-कॅनडा 2023 या प्रदर्शनातील भारतीय दालनाचे उद्घाटनही मंत्री करतील. हा उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठा खाद्यपदार्थाशी संबंधित नाविन्यपूर्ण व्यापारी प्रदर्शन असून त्यात 50 देशातील 1000 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योजक सहभाग घेतील. किरकोळ विक्री क्षेत्र , खानपान सेवा आणि खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योगाच्या गरजांवर या कार्यक्रमात विचार करण्यात येईल. एसआयएएल कॅनडा या प्रदर्शनात , भारतीय व्यापार चालना मंडळ (टीपीसीएल), कृषी आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण(एपीईडीए), भारतीय व्यापार चालना संघटना (आयटीपीओ) आणि असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (आसोचाम) यांचा व्यावसायिक सहभाग असेल. भारतीय कंपन्यांसमवेत तसेच कॅनडातील आयातदारांसमवेत कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठीही एका बैठक होईल. 200 कंपन्या या कार्यक्रमात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.
द्विपक्षीय व्यापार आणि गुतंवणूक संबंधांना या भेटीमुळे आणखी गती देण्यात येण्याची अपेक्षा आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply