मुंबई, ८ एप्रिल (हिं.स.) : हिंडनबर्ग ही परदेशी कंपनी आहे. या कंपनीचं नाव यापूर्वी कधीही ऐकलेलं नाही. त्यामुळे अशा कंपनीच्या अहवालापेक्षा या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अहवाल आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. ही आमची भूमिका असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. असे असताना या भूमिकेचा विरोधकांच्या एकजुटीवर काहीही परिणाम होणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हिंडनबर्ग अहवाल आणि अदानी प्रकरणी संयुक्त चिकित्सा समितीची (जेपीसी) आवश्यकता नाही, असे मत त्यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले होते. त्यानंतर आलेल्या प्रतिक्रियांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
प्रकरणाची चौकशी नीट करावी हीच अपेक्षा!
पवार म्हणाले की, संयुक्त चिकित्सा समितीमध्ये जेवढे सदस्य असतात, त्यामध्ये सर्वाधिक सदस्य हे सत्ताधारी पक्षाचे असतात. त्यामुळे या समितीमध्ये विरोधी पक्षांना खूप जास्त स्थान मिळू शकत नाही. त्यामुळेच जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समिती यामध्ये जास्त परिणामकारक ठरेल. या प्रकरणाची चौकशी नीट करावी अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे जेपीसी ऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे. जेपीसीला मी विरोध करत नाही, जेपीसीचा मीही अध्यक्ष होतो. जेपीसी बहुमत बळावर समिती असते, त्यामुळे सर्वोच्च न्यायालय समिती अधिक प्रभावी ठरेल. बाहेरची संघटना सांगेल त्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समिती जे सांगेल ते जनता स्वीकारेल, असेही ते म्हणाले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply