रत्नागिरी, 5 जून, (हिं. स.) : राज्यातील यापुढील ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका महायुती म्हणूनच लढविणार आहोत, अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे प्रसारमाध्यमांना दिली.
विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने रत्नागिरीत आले असता त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती करून आम्ही निवडणुका लढविणार आहोत. शिवसेना- भाजपा आणि आरपीआय आठवले गट अशी ही महायुती आहे. महायुतीचे नेते जो निर्णय घेतील, तो महायुतीतील सर्वांना मान्य असेल, असेही ते म्हणाले.
रत्नागिरीच्या पोलीस वसाहतीच्या इमारतीचे भूमिपूजन येत्या आठवडाभरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल, असेही सामंत म्हणाले. खासदार संजय राऊत सरकारवर सातत्याने टीका करतात. याबाबत विचारले असता सामंत म्हणाले, त्यांची टीका मनावर घेण्याची गरज नाही. त्यांच्या प्रत्येक टीकेची उत्तरे देऊन त्यांना कशासाठी मोठे करायचे, असा प्रतिसवाल त्यांनी केला.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply