नवी दिल्ली, 5 जून (हिं.स.) : जागतिक पातळीवर हवामान रक्षणासाठी जगातील प्रत्येक देशाने निहित स्वार्थापलीकडे जाऊन विचार केला पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज आयोजित केलेल्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले.
ते पुढे म्हणाले की, आधी स्वत:च्या देशाचा विकास करण्याबद्दल विचार करायचा आणि त्या नंतर पर्यावरणाची चिंता करायची हेच विकासाचे मॉडेल जगातील मोठ्या आणि आधुनिक देशांमध्ये प्रदीर्घ काळापासून प्रचलित आहे. अशा देशांनी विकासाची उद्दिष्टे साध्य केली असली तरी जागतिक पर्यावरणाला त्याची किंमत मोजावी लागली आहे. जगातील विकसनशील आणि अविकसित देश काही विकसित देशांच्या सदोष धोरणांमुळे त्रस्त आहेत. काही दशकांपासून, काही विकसित देशांच्या या वृत्तीला रोखण्यासाठी कोणताही देश सज्ज नव्हता, मात्र भारताने अशा प्रत्येक देशासमोर हवामान न्यायाचा परिपाठ घालून दिल्याचा आपल्याला आनंद असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधत पंतप्रधानांनी जगातील प्रत्येक देशाला जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची मुख्य संकल्पना असलेल्या ‘एकल वापराच्या प्लास्टिकपासून मुक्ती मिळविणे’ या उद्दिष्टाला अधोरेखित करत गेल्या 4 ते 5 वर्षांत भारत या दिशेने सतत कार्यरत आहे याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. एकल वापराच्या प्लास्टिकपासून मुक्ती मिळविण्यासाठी वर्ष 2018 पासून भारत दोन स्तरांवर काम करत आहे अशी माहिती त्यांनी दिली. “एकीकडे आपण एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी आणली असून दुसरीकडे प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणे आपण अनिवार्य केले आहे,” ते म्हणाले. यामुळे भारतात दर वर्षी उत्पादित होणाऱ्या एकूण प्लास्टिक कचऱ्याचा 75 % भाग म्हणजेच सुमारे 30 लाख टन प्लास्टिकचा प्रक्रिया करून पुनर्वापर करणे सक्तीचे करण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी दिली. सुमारे 10 हजार उत्पादक, आयातक आणि ब्रँड्स आज या नियमाच्या कक्षेत आले आहेत असे त्यांनी सांगितले.
हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षण यांच्या संदर्भातील अत्यंत स्पष्ट आराखड्यासह एकविसाव्या शतकातील भारत आगेकूच करतो आहे यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला. भारताने सद्यकालीन गरजा आणि भविष्यावर नजर यांचा समतोल साधला आहे हा मुद्दा अधोरेखित करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील सर्वात गरीब व्यक्तीला आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यात आली असून भविष्यातील उर्जाविषयक गरजा लक्षात घेऊन व्यापक पावले उचलण्यात आली आहेत. “गेल्या 9 वर्षांच्या काळात भारताने पर्यावरणस्नेही हरित आणि स्वच्छ उर्जा यांच्यावर अभूतपूर्व प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे,” पंतप्रधान म्हणाले. त्यांनी यासाठी जनतेच्या पैशांची बचत करणाऱ्या तसेच पर्यावरण रक्षणासाठी योगदान देणाऱ्या सौर उर्जा तसेच एलईडी दिव्यांचे उदाहरण दिले. जागतिक महामारीच्या संकटकाळात भारताने केलेल्या नेतृत्वावर अधिक प्रकाश टाकत पंतप्रधान म्हणाले की, भारताने या काळात हरित हायड्रोजन मोहीम सुरु केली असून माती तसेच पाणी यांचे रासायनिक खतांपासून संरक्षण करण्यासाठी नैसर्गिक शेती पद्धतीचा स्वीकार करण्याच्या दृष्टीने काही प्रमुख योजना हाती घेतल्या आहेत.
“गेल्या 9 वर्षात भारतातील पाणथळ जागा आणि रामसर ठिकाणांची संख्या पूर्वीच्या तुलनेत जवळपास तिपटीने वाढली आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. हरित भविष्य, हरित अर्थव्यवस्था यासारख्या मोहिमांना आणखी पुढे नेण्यासाठी आज आणखी दोन योजना सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. लोकसहभागातून रामसर स्थळांचे संवर्धन करता यावे यासाठी ‘अमृत धरोहर योजना’ सुरू केली आहे, असे त्यांनी नमूद केले. भविष्यात ही रामसर स्थळे इको-टूरिझमचे केंद्र बनतील आणि हजारो लोकांसाठी हरित रोजगाराचे स्रोत बनतील, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. दुसऱ्या योजनेचे नाव ‘मिष्टी योजना’ आहे, ही योजना देशाच्या खारफुटीच्या परिसंस्थेचे पुनरुज्जीवन करण्याबरोबरच तिचे संरक्षण करण्यास मदत करेल, अशी माहिती त्यांनी दिली. देशातील 9 राज्यांमध्ये खारफुटीचे क्षेत्र परत तयार केले जाईल. त्यामुळे समुद्राची वाढती पातळी आणि चक्रीवादळासारख्या आपत्तींमुळे किनारपट्टीवरील लोकांच्या जीवनाला तसेच त्यांच्या उपजीविकेच्या साधनांना असलेला धोका कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
“भारताच्या हजारो वर्षांच्या प्राचीन संस्कृतीमध्ये निसर्गाबरोबरच प्रगतीही आहे”, असे पंतप्रधानांनी सांगितले. भारताच्या पर्यावरण आणि अर्थव्यवस्था या दोन्हींकडे लक्ष पूरवण्याची प्रेरणा देण्याचे श्रेय या संस्कृतीचे आहे, असे ते म्हणाले. भारत पायाभूत सुविधांमध्ये जितकी अभूतपूर्व गुंतवणूक करत आहे तितकेच पर्यावरणावरही लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थव्यवस्था आणि पर्यावरण वाढीची तुलना करताना, एकीकडे 4G आणि 5G कनेक्टिव्हिटीच्या विस्ताराची उदाहरणे तर दुसरीकडे देशाचे वाढलेले वनक्षेत्र असे ते म्हणाले. भारताने गरिबांसाठी 4 कोटी घरे बांधली आहेतच शिवाय भारतात वन्यजीव अभयारण्य तसेच वन्यजीवांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.जल सुरक्षेसाठी जल जीवन अभियान आणि 50,000 अमृत सरोवरांची निर्मिती , भारत जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणे आणि नवीकरणीय उर्जेच्या बाबतीत पहिल्या 5 देशांमध्ये समाविष्ट होणे, कृषी निर्यात वाढवणे आणि पेट्रोल मध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाची मोहीम राबवणे या विषयांनाही त्यांनी स्पर्श केला. आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीची आघाडी – सीडीआरई आणि मार्जार कुळातील वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठीची आंतरराष्ट्रीय आघाडी यांसारख्या संस्थांचा भारत आधार बनला आहे, असे त्यांनी नमूद केले.
मिशन लाइफ म्हणजेच पर्यावरणस्नेही जीवनशैली अवलंबण्यासाठीचे अभियान ही एक सार्वजनिक चळवळ बनल्याबद्दल बोलताना, हे अभियान हवामान बदलावर मात करण्यासाठी जीवनशैलीतील बदलांबद्दल नवीन जागरूकता पसरवत आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. गेल्या वर्षी केवडिया-एकता नगर, गुजरातमध्ये जेव्हा हे अभियान सुरू करण्यात आले तेव्हा लोकांमध्ये कुतूहल होते मात्र महिनाभरापूर्वी मिशन लाइफ संदर्भात एक मोहीम सुरू करण्यात आली त्यात 30 दिवसांपेक्षा कमी कालावधीत 2 कोटी लोक या मोहिमेचा भाग बनले, याचा उल्लेख त्यांनी केला. ‘गिव्हिंग लाइफ टू माय सिटी’ या भावनेने रॅली आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्याबाबतही त्यांनी माहिती दिली.“लाखो सहकाऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात कमी वापर , पुनर्वापर , पुनर्प्रक्रिया हा मंत्र स्वीकारला आहे”,असे सांगत मिशन लाइफचे मूळ तत्व म्हणजे जग बदलण्यासाठी एखाद्याचा स्वभाव बदलणे यावर पंतप्रधानांनी भर देत त्याचे महत्व अधोरेखित केले. “मिशन लाइफ हे संपूर्ण मानवजातीच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या भावी पिढ्यांसाठी तितकेच महत्त्वाचे आहे”,असे पंतप्रधान म्हणाले.
“हवामान बदलाबाबतची ही जाणीव केवळ भारतापुरती मर्यादित नाही, तर जगभरातून या उपक्रमाला जागतिक पाठिंबा वाढत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.व्यक्ती आणि समुदायांमध्ये हवामानस्नेही वर्तनात्मक बदल घडवून आणण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय सामायिक करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी गेल्या पर्यावरण दिनाला जागतिक समुदायाला केले होते त्याची आठवण पंतप्रधानांनी यावेळी करून दिली. सुमारे 70 देशांतील विद्यार्थी, संशोधक, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, व्यावसायिक, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिकांसह हजारो सहकाऱ्यांनी त्यांची मते आणि उपाय सांगितल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.तसेच ज्यांना त्यांच्या कल्पनांसाठी पुरस्कार मिळाले त्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
मिशन लाइफच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल भविष्यात पर्यावरणासाठी एक मजबूत ढाल बनेल, असे पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप करताना सांगितले. लाईफसाठी सुविचारांचा (थॉट लीडरशीप) संग्रह देखील आज प्रकाशित करण्यात आला आहे.अशा प्रयत्नांमुळे हरित विकासाचा संकल्प आणखी बळकट होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply