मुंबई, ५ मे (हिं.स.) : २०२० मध्ये कोरोना काळातील टाळेबंदी दरम्यान वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी नार्वेकर, लोढा यांच्यासह अन्य आरोपींविरोधात गुरुवारी आरोप निश्चित करण्यात आले. दरम्यान सर्व आरोपींनी सर्व आरोप अमान्य केले. त्यामुळे आता १७ मे पासून खटल्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने दिले आहेत.
वर्ष २०२० मध्ये कोरोनामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीतही वाढीव वीज बिलांविरोधात तत्कालीन विरोधी पक्षात असलेले भाजप आमदार राहुल नार्वेकर, लोढा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन पुकारले होते. ज्यात त्यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापकांना घेरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या संदर्भात विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर नार्वेकर, लोढा यांच्यासह इतर आरोपी हजर झाले होते. त्यावेळी आरोपांचे वाचन केले असता सर्वांनी हे आरोप अमान्य असल्याचे सांगत आपण निर्दोष असल्याचा दावा केला. त्यानंतर न्यायाधीशांनी भादंवि कलम ३५३, ३४१, ३३२, १४३, १४६ तसेच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान प्रतिबंधक कायदा आणि महामारी प्रतिबंध कायद्यांतर्गत २० आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले.
सुनावणीला वारंवार अनुपस्थित राहिल्यामुळे न्यायालयाने लोढा आणि नार्वेकर यांच्यासह अन्य आरोपींविरोधात ५ हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंटही बजावले होते. त्यानंतर सर्व आरोपींनी न्यायालयात तातडीने उपस्थित राहात हे वॉरंट रद्द करून घेतले होते.
दरम्यान न्यायालयात हजर असताना एक आरोपी आणि माजी नगरसेवक सुनील गणाचार्य यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांच्या वकिलांनी तातडीने त्यांना वैद्यकीय मदतीची गरज असल्याची माहिती न्यायालयाला दिली. न्यायालयाने त्याची दखल घेत गणाचार्य यांच्यावरील कार्यवाही पूर्ण करत त्यांना रुग्णालयात जाण्यास परवानगी दिली.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply