नवी दिल्ली, 05 एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज, बुधवारी राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये दुसऱ्या पद्म पुरस्कार वितरण सोहळ्यात 2023 वर्षासाठी 3 पद्मविभूषण, 5 पद्मभूषण आणि 47 पद्मश्री पुरस्कार प्रदान केले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड , पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील प्राध्यापक दीपक धर यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी पद्म भूषण सन्मान तर कला क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. परशुराम कोमाजी खुणे, रविना रवी टंडन, श्रीमती कुमी नरीमन वाडिया यांना आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील योगदानासाठी श्री गजानन जगन्नाथ माने यांना आज राष्ट्रपतींनी पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. गेल्या 22 मार्च 2023 रोजी पहिला पद्म पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर , केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्र्यांनी नवी दिल्लीतील सुषमा स्वराज भवन येथे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी आयोजित केलेल्या भोजनप्रसंगी पद्म पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला. पद्म पुरस्कार विजेते उद्या, गुरुवारी 6 एप्रिल रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे श्रद्धांजली अर्पण करतील. तसेच ते अमृत उद्यान आणि राष्ट्रपती भवन तसेच प्रधानमंत्री संग्रहालयालाही भेट देतील.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply