नागपूर, 04 जून (हिं.स.) : आगामी 5 वर्षात देशभरात सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रिक बसेसनी व्हावी असा प्रयत्न असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नागपुरात दिली. मोदी सरकारच्या 9 वर्षातील कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. मोदींच्या नेतृत्वातील 9 वर्षे भारताच्या विकासाचे सुवर्ण युग आहे असेही गडकरींनी सांगितले.
याप्रसंगी गडकरी म्हणाले की, देशात तब्बल 60 वर्षे काँग्रेसची सत्ता होती. तर भाजप गेल्या 9 वर्षांपासून सत्तेत आहे. या दोन्ही कार्याकाळांची तुलना केल्यास खरा विकास कधी झाला आणि कुणी केला याची कल्पना येते. यापूर्वी गरीबांची केवळ साडेतीन कोटी बँक खाती होती. आता जनधन योजनेत 48 कोटी बँक खाती आहे. वयश्री योजनेतंर्गत नागपुरात 36 कोटींचे दिव्यांग साहित्य 38 हजार लोकांना वितरीत करण्यात आले. उज्वला योजनेत देशभरात 9.6 कोटी गॅस कनेक्शन देण्यात आले.
स्वच्छ भारत योजनेत 11.72 कोटी शौचालये बांधली. कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचा रस्ता बांधकामात उपयोग करण्याचे धोरण तयार करीत आहो. पीएम-किसान योजनेतंर्गत 11 कोटी शेतकऱ्यांना नियमित मदत मिळत आहे. पंतप्रधान आवास योजनेत 3 कोटींना घरे मिळाली. 40 कोटी तरूणांना स्किल इंडिया अंतर्गत कौशल्य प्रशिक्षण दिले. सरकारी नोकऱ्या किती दिल्या? या प्रश्नावर रोजगार आणि स्वयंरोजगार महत्वाचा आहे असे गडकरी म्हणाले. सर्व विभागांना रिक्त जागा भरण्याचे आदेश दिले आहे. सरकार आणि खासगी क्षेत्रातही रोजगार वाढला आहे. स्वयंरोजगारावर सरकारचा भर असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
यावेळी गडकरी यांनी मदर डेअरी संदर्भात घोषणा करताना सांगितले की, नागपुरात मदर डेअरी 400 कोटींचे उत्पादन यूनिट सुरू करणार आहे. त्यासाठी 10 हेक्टर जागा देणार आहे. रसगुल्ल्यापासून श्रीखंडापर्यत सर्व दूधाची उत्पादने या कारखान्यात उत्पादित होतील. मध्य भारत आणि दक्षिण भारतात येथील उत्पादने जातील अशी माहिती गडकरींनी दिली. या यूनिट नंतर दूध खरेदी 3 लाख लिटरवरून 30 लाख लिटरपर्यत जाईल असे गडकरींनी सांगितले. देशाचे ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर सध्या साडेसात लाख कोटींचे आहे. सर्वाधिक जीएसटी देणारे हे क्षेत्र आहे. लवकरच ते 15 लाख कोटींचे करू असेही गडकरी म्हणाले.
यावेळी राजकारणावर भाष्य करताना गडकरी म्हणाले की, राजकारणाची व्याख्या नव्याने करण्याची गरज आहे. राजकारण हा पैशे कमावण्याचा धंदा होऊ शकत नाही. राजकारण म्हणजे सत्ताकारण आणि सत्ताकारण म्हणजे लक्ष्मीदर्शन असे नाही. राजकारण म्हणजे समाजकारण, विकासकारण आणि राष्ट्रकार्य आहे. हे सामाजिक व आर्थिक बदलाचे एक साधन आहे असे गडकरींनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply