मुंबई, 4 जून (हिं.स.) रुपेरी पडद्यावरच्या सहजसुंदर अभिनयानं सिनेरसिकांना आई, बहिण, वहिनीच्या नात्याचं ममत्व देणाऱ्या सुलोचना दीदींच्या निधनानं भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यांनी ज्येष्ठ अभिनेत्री, महाराष्ट्रभूषण सुलोचना यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.
ते म्हणाले की, सुलोचना दीदींनी मराठी, हिन्दी चित्रपटात साकारलेल्या भूमिका चरित्र अभिनयाचा आदर्श आहेत. ‘मराठा तितुका मेळवावा’ चित्रपटातल्या अभिनयानं त्यांनी जिजाऊँ माँसाहेबांचं जिवंत दर्शन घडवलं, त्यांची ती भूमिका केवळ अविस्मरणीय आहे. अमिताभ, धर्मेंद्र, राजेंद्रकुमार, शशीकपूर या अभिनेत्यांच्या यशस्वी कारकिर्दीत, त्यांच्या ‘आई’ची भूमिका साकारणाऱ्या सुलोचना दीदींचं मोलाचं योगदान आहे. चेहऱ्यावरचा सोज्वळपणा, वागण्यातला सुसंस्कृतपणा, मनातला आत्मविश्वास, कुठलीही भूमिका सहजपणे साकारण्याची क्षमता अशा गुणांमुळे सुलोचना दीदींकडे अभिनयाचं विद्यापीठ म्हणून बघावं लागेल. महाराष्ट्रभूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित केल्यामुळे एका अर्थाने या पुरस्कारांचा गौरव वाढण्यास मदत झाली. सुलोचना दीदींनी गेली सहा दशकं मराठी, हिन्दी चित्रपट रसिकांच्या मनात आणि कुटुंबातही स्थान मिळवलं होतं. त्यांचं निधन हा आपल्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. मी सुलोचना दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply