नवी दिल्ली, 3 एप्रिल (हिं.स.) : शिक्षणाची उपलब्धता वाढवण्यात, सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यात इग्नू सारख्या संस्थांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. नवी दिल्लीत इग्नू म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा 36 वा दीक्षांत समारंभ झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
दुर्गम भागातील, ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या मागास भागातील विद्यार्थ्यांना या संस्थांमुळे शिक्षणाची संधी मिळाली आहे. या विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्यक्रमात असलेल्या लवचिकतेमुळे, अनेक विद्यार्थी, त्यांचे काम, कौटुंबिक आणि इतर जबाबदाऱ्या पार पाडता पाडता, उच्च शिक्षण पूर्ण करू शकले आहेत.
अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि परिस्थितीचे अडथळे यामुळे त्यांचे उच्चशिक्षण सुरु ठेवणे कठीण जाते. अशा विद्यार्थ्यांना इग्नूसारख्या मुक्त शिक्षणसंस्था दूरस्थ शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देत, मदत करत आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. अनेक नोकरदार, स्वयंउद्योजक देखील, आपली कौशल्ये-ज्ञान वाढवण्यासाठी , इग्नूमधून शिक्षण घेत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. अशा ‘कमवा आणि शिका’ व्यवस्थेमुळे, दूरस्थ शिक्षण घेता घेता विद्यार्थी आपली अल्प रोजगारी दूर करु शकतात, असेही त्यांनी सांगितले. म्हणजेच, दूरस्थ शिक्षणाची एक व्यापक सामाजिक-आर्थिक उपयुक्तता आहे, असे त्यांनी विशद केले. इग्नू अशा सर्व विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण देत, त्यांची मोठीच सोय करत आहे, असेही त्या म्हणाल्या.
शिक्षणाच्या माध्यमातून देश बांधणीत देखील इग्नूची भूमिका महत्वाची आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत, वर्ष 2035 पर्यन्त, देशात उच्च शिक्षण क्षेत्रातील नोंदणी 50 टक्क्यांपर्यन्त नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यात इग्नूचे योगदान अतिशय महत्वाचे ठरत आहे, असेही राष्ट्रपतींनी नमूद केले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply