अमरावती, 3 जून (हिं.स.) अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आज मुंबई येथे प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवनात काँग्रेस अध्यक्ष प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार, सोशल मिडिया प्रमुख विशाल मुत्तेमवार, देवानंद पवार, पूनम पटेल, ओबीसी सेलचे प्रमुख अरविंद माळी, माजी मंत्री नसीम खान यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीत अॅड. यशोमती ठाकूर यांनी अत्यंत आक्रमकपणे अमरावती जिल्ह्यात काँग्रेस सशक्त असून अमरावती हा जिंकण्याची शाश्वती असलेला लोकसभा मतदारसंघ असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला पाहिजे असा आग्रह धरला. जिल्ह्यातील काँग्रेस एकजुटीने काँग्रेसचा उमेदवार निवडून आणेल असा निर्वाळा देत कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ काँग्रेसलाच सुटला पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली आणि त्यांच्या भूमिकेला जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी जोरदार समर्थन दिले.त्याचप्रमाणे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आक्रमक होत अमरावती मतदार संघ हा कॉंग्रेसलाच सुटावा अशी आग्रही मागणी या वेळी केली. बैठकीस माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख, सर्वश्री आ. बळवंतराव वानखेडे, विरेंद्र जगताप, दिलीप एडतकर आदींची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये काँग्रेसच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी अमरावती मतदारसंघ काँग्रेसलाच सोडण्यात यावा अशी आग्रही भूमिका धरल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठी याबाबत अनुकूल भूमिका घेतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply