नवी दिल्ली, 3 जून (हिं.स.) : नवोदित स्टार्टअप उद्योजकांनी माहिती तंत्रज्ञान, संगणक आणि दूरसंचार क्षेत्राच्या पलीकडे जाऊन आजवर ज्याबाबत कधीही विचार झाला नाही अशा आणि ज्याला हरित क्रांतीनंतरही आज तंत्रज्ञान क्रांतीची प्रतीक्षा आहे, अशा समृद्ध कृषी क्षेत्रांचाही विचार करावा, असे आवाहन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी दिला. ते शुक्रवारी नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात तरुणांना संबोधित करत होते.
गेल्या 9 वर्षात स्टार्टअप क्षेत्राने केलेली प्रगती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या यशाची महान यशोगाथा आहे. 2014 पूर्वी देशात सुमारे 350 स्टार्टअप होते, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लाल किल्ल्यावरून घोषणा केल्यानुसार 2016 मध्ये विशेष स्टार्टअप योजना सुरू केली. ही या क्षेत्रातील गरुडझेप होती आणि त्यानंतर आज भारताकडे जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप प्रणाली असून यामध्ये 115 पेक्षा जास्त युनिकॉर्न (अब्जो डॉलरची उलाढाल करणारा उद्योग) सह 92,683 स्टार्टअप देखील आहेत. याशिवाय, 2016 मध्ये स्टार्टअप इंडिया उपक्रमाचा प्रारंभ झाल्यापासून स्टार्टअप्सनी प्रत्यक्ष आणि अनेक अप्रत्यक्षरित्या लाखो लोकांना नोकरीत सामावून घेतल्याचे ते म्हणाले.
भारतातील तरुण आज सरकारी नोकरीच हवी या मानसिकतेतून हळूहळू बाहेर पडत आहे आणि विविध क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी, तसेच विशिष्ट क्षेत्रांमध्ये नवीन संधी निर्माण करण्यास तयार आहेत. त्यामुळे देशात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या योजनांच्या उत्तर प्रदेशातील संभल येथील युवा लाभार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, गेल्या 9 वर्षांत सरकारचे लक्ष केवळ रोजगार निर्मितीवर केंद्रित नसून उद्योजकता निर्माण करण्यावरही भर दिला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवकाश क्षेत्राची दारे खाजगी क्षेत्राच्या सहभागासाठी खुली केली. परिणामी आज इस्रो जवळपास 150 खाजगी स्टार्टअप्ससोबत काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. 2014 मध्ये 25,000 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेला कृषी अर्थसंकल्प आता 1.25 लाख कोटींहून अधिक करण्यात आला आहे, असे ते म्हणाले. कृषी आणि संलग्न क्षेत्राच्या वाढीची क्षमता वर्धित करण्यासाठी सरकारने 1 लाख कोटी रुपये कृषी पायाभूत सुविधा निधी पुरवला आहे, असे त्यांनी सांगितले.
गेल्या नऊ वर्षांत मोदी सरकारने प्रत्येक भारतीयाला सक्षम बनवण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. तरुणांसाठी नवीन औपचारिक नोकऱ्या निर्माण करण्याच्या मोदी सरकारच्या प्राधान्याचे यश नवीन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यावरून दिसून येते. सरकारने केवळ रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित केले नाही तर उद्योजकता निर्माण करणे तसेच तरुणांना नोकरी शोधणारे न राहता नोकरी देणारे बनवणे यावरही भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply