मुंबई, 02 मे (हिं.स.) : मुंबईत आगामी 23 ते 25 मे दरम्यान जी 20 परिषदेच्या आपत्कालीन जोखीम सौम्यीकरण कार्यगटाची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका तसेच इतर विविध यंत्रणा करीत असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महानगरपालिका मुख्यालयात बैठक घेतली.
आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये मागील काही वर्षांत मुंबईने केलेले कार्य देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर देखील नावाजले आहे. जी 20 परिषदेच्या आपत्कालीन जोखीम सौम्यीकरण कार्यगटाच्या नियोजित बैठकीच्या निमित्ताने ही कामगिरी जगासमोर अधोरेखित करण्याची संधी आहे. हे लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिकेसह सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय राखून विहित वेळेत कामे पूर्ण करावीत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी यावेळी दिले. मुंबईत जी 20 परिषदेच्या आपत्कालीन जोखीम सौम्यीकरण कार्यगटाच्या (Disaster Risk Reduction group) बैठकीला 23 मे पासून प्रारंभ होणार आहे. सुमारे 120 पेक्षा अधिक सदस्य या बैठकीला हजर राहणार आहेत. या परिषदेच्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला कार्यगटाचे प्रतिनिधी भेट देणार आहेत. यामध्ये मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाचा अभ्यास दौरा करतील, महानगरपालिका इमारतीचा हेरिटेज वॉक या बाबी समाविष्ट असतील. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील भेटीच्या अनुषंगाने महानगरपालिका मुख्यालय इमारतीत सुरू असलेली कामे वेळीच पूर्ण करावीत, असेही आयुक्तांनी नमूद केले. त्यासोबतच सर्व यंत्रणांसोबत उत्तम समन्वय राखून इतरही कामे पूर्ण करावीत, असे निर्देश आयुक्त चहल यांनी दिले.मे महिन्यात जी 20 परिषदेच्या एकूण तीन कार्यगटांची बैठक होत आहे. त्यामुळे या तीनही बैठकांच्या निमित्ताने सर्व संबंधित विभागांच्या हद्दीत रस्ते, स्वच्छता, सुशोभीकरण इत्यादींची कामे मागील बैठकांच्या वेळी असणारा अनुभव लक्षात घेवू पूर्ण करावीत. त्याबाबतच्या पूर्वतयारीचा आढावा देखील पुढील आठवड्यात घेतला जाईल, असे आयुक्तांनी नमूद केले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply