नवी दिल्ली,02 मे (हिं.स.) : देशातील वाडिया समूहाची खासगी विमान कंपनी गो-फस्ट दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. कंपनीने एनसीएलटीमध्ये ऐच्छीक दिवाळखोरीच्या कारवाईसाठी अर्ज केल्याची माहिती पुढे आलीय.
इंजिन निर्माता प्रॅट अँड व्हिटनी यांनी त्याचा पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे कंपनीकडे पैशांची मोठी कमतरता आहे. विमान कंपनीचा निधी संपला आहे. यामुळे ते तेल कंपन्यांची थकबाकी भरू शकत नाहीत. या कंपन्यांनी त्यांना तेल देण्यास नकार दिला आहे.तसेच कंपनीने 3 आणि 4 मे रोजी गो फर्स्टची सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. इंजिन उपलब्ध नसल्यामुळे कंपनीची अर्ध्याहून अधिक विमाने उड्डाण करू शकत नाहीत. त्यामुळे त्याच्या रोख रकमेवर वाईट परिणाम झाला आहे. तसेच, त्याच्या एअरबस ए-320 नियो विमानांना प्रॅट अँड व्हिटनी इंजिनचा पुरवठा केला जात नाही.
दरम्यान, विमान कंपनीने ‘प्रॅट अँड व्हिटनी’ या विमानाचे इंजिन बनवणाऱ्या कंपनीविरुद्ध अमेरिकन न्यायालयात खटला दाखल केला आहे. यापूर्वी 30 जून रोजी गो फर्स्टच्या बाजूने निर्णय आला होता. विमान कंपनीला इंजिन न मिळाल्यास ते बंद करण्यात येईल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी गो फर्स्टने अमेरिकन कोर्टात केस दाखल केली आहे. कंपनीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, कंपनीच्या ताफ्यात 61 विमाने आहेत. यामध्ये 56 ए-320 नियो आणि पाच ए-320 सीईओचा समावेश आहे. एअरलाइनने या उन्हाळ्यात दर आठवड्याला 1,538 उड्डाणे चालवण्याची योजना आखली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 टक्क्यांनी कमी आहे. हा हंगाम 26 मार्चपासून सुरू झाला असून 28 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply