सिंगापूर, 1 जून (हिं.स.) : परस्पर आणि जागतिक समृद्धीसाठी भारत आणि सिंगापूर सारखे नैसर्गिक सहयोगी एकत्र काम करण्यासाठी वचनबद्ध आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. त्यां च्या तीन दिवसीय सिंगापूर दौऱ्याचा बुधवारी समारोप झाला. भारत आणि सिंगापूर यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसेच शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात दोन देशांनी एकत्रित काम करण्याच्या दृष्टीने विविध शक्यता आजमावण्यासाठी प्रधान सिंगापूर दौऱ्यावर गेले होते. चान चुन सिंग यांनी मागील तीन जी 20 शिक्षण कार्यकारी गटाच्या बैठकीत सहभाग घेतल्याबद्दल प्रधान यांनी त्यांचे आभार मानले. पुणे येथे होणाऱ्या जी 20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सिंगापूरचे शिष्टमंडळ सहभागी होणार आहे.
आपल्या दौऱ्यात प्रधान यांनी सिंगापूरचे शिक्षण आणि उच्च शिक्षण मंत्री चान चून सिंग यांची भेट घेतली. परस्पर सहकार्य अधिक मजबूत करणे तसेच शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या सगळ्या आघाड्यावर एकत्रित प्रयत्न याविषयी या दोन मंत्र्यांनी फलदायी चर्चा केली.
शालेय स्तरावरच कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षणाचे निरंतर एकात्मिक शिक्षण देण्यासाठी भारत आणि सिंगापूर यांच्यात भागीदारी कशी करता येईल याचे मार्ग प्रधान यांनी सांगितले. संस्थात्मक यंत्रणा राबवून दोन देशातील भागीदाराचा आणखी विस्तार करण्याच्या मुद्द्यांवर दोघांनी सहमती दाखवली. त्यात प्रामुख्याने शिक्षक आणि प्रशिक्षकांमध्ये क्षमता निर्माण करणे, शिक्षण आणि कौशल्य विकास परिसंस्थेत भविष्यातील कौशल्याचा समावेश करणे, तसेच विशेष शाळा आणि क्रीडा विद्यालयांच्यासंदर्भात याबाबतीतले प्रयत्न या मुद्द्यांचा त्यात समावेश होता.
धर्मेंद्र प्रधान यांनी स्किल्स फ्युचर सिंगापूरलाही भेट दिली. स्किल्स फ्युचर सिंगापूर हा सिंगापूरला भविष्यासाठी सज्ज बनवण्यासाठी सिंगापूर सरकारचा महत्त्वाचा उपक्रम आहे. सिंगापूरला आजीवन शिकणाऱ्यांचे राष्ट्र बनवणे आणि कौशल्य प्रभुत्वाला महत्त्व देणारा समाज बनवणे यासाठी स्किल्स फ्युचर या उपक्रम प्रयत्न करत आहे. प्रधान यांनी सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी आणि डिझाइनला भेट दिली.
21 वे शतक हे भारताचे शतक असेल यावर प्रधान यांनी भर दिला. इंग्लंडमधील नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी (एनटीयू) सारखी जागतिक विद्यापीठे आणि भारतीय विद्यापीठांनी 21 व्या शतकाला प्रेरणा देण्यासाठी नवीन मॉडेल्स तयार करण्यासाठी सहयोग केला पाहिजे आणि त्यांचे कार्य अधिक सखोल केले पाहिजे, असे ते म्हणाले.
सिंगापूरमधील आयआयटी आणि आयआयएम, ओडिया असोसिएशन आणि भारतीय समूदायाच्या माजी सदस्यांची भेट घेतली.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply