Home राजकारण नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करुण देण्याचा प्रयत्न – वर्धा जिल्हाधिकारी

नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करुण देण्याचा प्रयत्न – वर्धा जिल्हाधिकारी

नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करुण देण्याचा प्रयत्न - वर्धा जिल्हाधिकारी

वर्धा, 1 मे (हिं.स.) : सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे, यासाठी विविध नाविन्यपुर्ण प्रयोग आपण राबवित आहोत. त्यासाठी ‘सेवादुत’ नावाची प्रणाली आपण विकसित केली. घरबसल्या विविध प्रकारच्या सेवा या प्रणालिद्वारे नागरिकांना उपलब्ध होतील. तालुकास्तरावरील सेतु केंद्र आपण महिलांना चालवायला दिले. ई-ऑफिस प्रणाली आपण तालुकापातळीवर नेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा उपलब्ध झाल्या पाहिजे, हाच यामागचा आपला उद्देश आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

महाराष्ट्र राज्स स्थापनेच्या 63 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित मुख्य समारंभात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते ध्वजारोहन झाले. त्याप्रसंगी शुभेच्छा संदेश देतांना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक नूरूल हसन, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्यासह विभागप्रमुख अधिकारी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, विरमाता, विरपत्नी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी 105 मराठी बांधवांनी हौतात्म्य पत्करले. त्या सर्व हुतात्म्यांसह महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी पुढाकार घेणाऱ्या सर्वांना सुरुवातीस अभिवादन केले.राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेला आपला जिल्हा देखील विकासाच्याबाबतीचे कुठेही मागे नाही. जिल्ह्यात विकासाचे विविध कार्यक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, या भावनेने शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु केली. जिल्ह्यात 53 हजार 212 शेतकऱ्यांना 769 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्यावर्षी 71 हजार शेतकऱ्यांना 953 कोटी रुपयांचे पिककर्ज वाटप करण्यात आले. यावर्षी 1 हजार 200 कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ठ आहे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना सिंचनासाठी प्राधान्याने वीज जोडण्या दिल्या जातात. यावर्षी आपण 3 हजार 763 पंपांना जोडणी देण्यात आली.

जिल्ह्यात बचतगटाची चळवळ फार मोठी आहे. गेल्या वर्षाप्रमाणेच यावर्षी देखील गटांना कर्जवाटपात जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. 10 हजार 841 गटांना 262 कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. प्रत्येकाला स्वच्छ आणि पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी जलजिवन मिशन राबविले जात आहे. मिशन अंतर्गत 881 गावात 839 पाणीपुरवठा योजनांची कामे केली जात आहे. योजनेतून आतापर्यंत 2 लाख 25 हजार कुटुंबांनी नळ जोडणी देण्यात आली आहे.

सर्वांसाठी घरे हा कार्यक्रम राज्यात मोठ्या प्रमाणावर राबविला जात आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात गेल्या सहा वर्षात 22 हजार 908 घरे बांधून देण्यात आली आहे. युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. यावर्षी आपण जिल्हाभर रोजगार मेळावे आयोजित केले. या मेळाव्यातून 1 हजार 142 उमेदवारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी ग्रामीण भागात 7 ठिकाणी कौशल्य विकास केंद्र सुरु करतो आहे, तर 5 मे पासून 6 जून पर्यंत युवकांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिरे घेत आहोत.

गेल्या काही दिवसात सातत्याने अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले. जुलै ते ऑगस्ट या कालावधी अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या २ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना ३४१ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. घरे आणि गोठ्याचे नुकसान झालेल्यांना ५ कोटी ५७ लाख रुपयांच्या मदतीचे वाटप केले. खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. यावर्षी जिल्ह्यात आपण ४ लाख ३३ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले आहे. त्यासाठी लागणारे बि-बियाने, खतांची उपलब्धता करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. ध्वजारोहण व मानवंदनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले. अनुकंपा व सरळसेवेच्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.