अमरावती, 1 मे (हिं.स.) : जमाता माँ जिजाऊ स्मारक परिसर सौंदर्यीकरणाची मागणी लक्षात घेता, याकरिता तयार झालेले डिझाइन बघता सिंदखेडराजाच्या धर्तीवर अमरावती येथील राजमाता माँ जिजाऊ पुतळा स्मारक परिसराचे सौंदर्यीकरण हे सुद्धा लक्षवेधी व दर्जेदार झाले पाहिजे. याकरिता अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत. यासोबतच मराठा सेवा संघाच्या सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या जागेवर तसेच सभागृहात होतकरू, प्रतिभाशाली विद्यार्थ्याकरिता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात यावे. याकरिता आवश्यक ते नियोजन व व्यवस्थापन केल्या गेले तर बहुजन समाजातील विद्यार्थ्याना त्यांच्या भावी वाटचालीकरिता ही बाब निश्चितच सुखावह ठरणारी आहे. या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन-अध्ययन करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तकांच्या उपलब्धतेसाठी आपण आपल्या आमदार निधीतून यथोचित निधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. यासोबतच या अभ्यासकेंद्रावर सद्यस्थितीत शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी व मान्यवरांचे अमूल्य मार्गदर्शनाचा लाभसुद्धा या विद्यार्थ्यांना निश्चितच होणार आहे. सामाजिक बांधिलकी जोपासीत समाजाचे काही देणे लागते या भावनेतून विद्यार्थी कल्याणकारी उपक्रम ठरू पाहत असलेल्या या स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांच्या उपलब्धीला घेऊन जास्तीतजास्त निधी, शक्यप्राय प्रयत्न तसेच यथोचित सहकार्य करण्यासाठी आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे. असे प्रतिपादन आमदार-सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी सोमवार दिनांक १ मे २०२३ रोजी राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ पुतळ्या जवळील मनपाच्या सार्वजनिक जागेवर सरंक्षण भिंत व पेव्हिंग ब्लॉक बसविणे या विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थितांना संबोधून केले. आमदार निधी स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत आर. टी. ओ. ऑफिस जवळ जुना बायपास रोड येथिल २४ लक्ष रुपये निधीतून केल्या जाणाऱ्या विकासकामांचे भूमीपूजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री आश्विन चौधरी, तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, विधिमंडळ समनवयक, प्रवक्ते-संजय खोडके, मराठा सेवा संघाचे राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष-अरविंद गावंडे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष-शिवमती-मनाली तायडे, यश खोडके आदी उपस्थित होते. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस सर्व उपस्थितांचे वतीने सामुहिक विनम्र अभिवादन करण्यात आले. तद्नंतर जिजाऊ वंदनेने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी कुदळ मारीत व विकासकामांच्या नामफलकाचे अनावरण करीत यावेळी आमदार-सौ. सुलभाताई खोडके यांनी भूमीपूजनाची औपचारिकता साधली. यावेळी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेडच्या सर्व सदस्य व पदाधिकारी यांच्या वतीने आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्यासह अन्य अतिथी मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply