Home Latest Posts खेड तालुक्यातील रामगड किल्ला नव्याने प्रकाशात

खेड तालुक्यातील रामगड किल्ला नव्याने प्रकाशात

खेड तालुक्यातील रामगड किल्ला नव्याने प्रकाशात

रत्नागिरी, 27 मार्च, (हिं.स.) : दापोली तालुक्यातील पालगड गावानजीक दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या सीमेवर रामगड नावाचा किल्ला नव्याने प्रकाशात आला आहे. दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे आणि डेक्कन महाविद्यालयाचे पुरातत्त्व अभ्यासक डॉ. सचिन जोशी यांनी अभ्यास करून या किल्ल्याचा शोध घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

पालगडच्या पूर्वेस दापोली-खेड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या सीमेवर समुद्रसपाटीपासून अंदाजे ३९० मीटर (१२८० फूट) उंचीवर असलेला छोटेखानी किल्ला आहे. मात्र या किल्ल्याबाबत लोकांना माहिती नाही. या किल्ल्याचा अभ्यास संदीप परांजपे आणि डॉ. सचिन जोशी यांनी केला. रामगड असे या किल्ल्याचे नाव आहे.

रामगड हा पालगडचा जोडकिल्ला असून आजवर या किल्ल्याची स्थाननिश्चिती झालेली नव्हती. महाराष्ट्रात रामगड नावाचे दोन किल्ले आहेत. त्यातील पहिला रामगड हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात आहे, तर दुसरा रामगड रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. या किल्ल्याची बांधणी कोणत्या काळात झाली, याविषयी माहिती नाही. मात्र पालगडबरोबरच हा किल्लादेखील बांधला गेला असावा. दोन्ही किल्ल्यांच्या बांधणीत अनेक समान गोष्टी दिसतात. या किल्ल्यांचे उल्लेख १७२८ पासून मिळतात. या किल्ल्याचे उल्लेख असलेली दोन-तीन कागदपत्रे उपलब्ध असून त्यातील पहिली नोंद १७२८ मधील आहे. ही यादी ऐतिहासिक संग्रहांमध्ये प्रसिद्ध झालेली असून त्यात सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यांची यादी आहे. या यादीत रामगड किल्ल्याचा उल्लेख पालगडबरोबर झालेला असून तो रामदुर्ग असा येतो.

पुढील दोन्ही पत्रे पेशवे दप्तरातील असून ती अनुक्रमे १७४५ आणि १८१८ मधील आहेत. त्यातील पहिले पत्र कोणी कोणास पाठवले, याचा उल्लेख प्रस्तुत खंडातील प्रसिद्ध लेखात नाही. मात्र रत्नागिरीमधील रामगड सिद्दीच्या ताब्यात असावा आणि तो सिद्दीवरील मोहिमेत परिसरातील रसाळगडाबरोबर पेशव्यांच्या ताब्यात आला असावा, असे या पत्रावरून समजते. मार्च १८१८ मधील या पत्रात इंग्रजी फौजा पालगड आणि रामगड येथे पहाटेपासून तोफांचा मारा करत असून किल्ल्यावर लागलेली आग खूप दुरून दिसत असल्याचे म्हटले आहे. हे पत्र धोंडो विश्वनाथाने निळोपंत पुरंदर यांना पाठवले आहे. मात्र या पत्रावरून रामगड आणि पालगड हे दोन्ही किल्ले एकमेकांच्या जवळ असल्याचे दिसून येते. पालगड आणि रामगड किल्ल्यांच्या भोवती एकूण पाच माच्या असून रामगड किल्ल्याच्या पश्चिमेस असून सध्या ती राणी माची या नावाने ओळखली जाते.

किल्ल्याची सॅटेलाइट इमेज पाहता पालगडच्या पश्चिमेकडे एक उंचवटा असून त्यावर बांधकामाचे अवशेष दिसून येतात. आकाराने अतिशय छोट्या माथ्यावर हे बांधकाम केलेले दिसून येते. किल्ल्याच्या सर्वेक्षणात किल्ल्याचा दरवाजा त्याचे २ संरक्षक बुरूज, चहू बाजूस असलेली रुंद तटबंदी तसेच तटबंदीतील ४ बुरूज, किल्ल्याच्या आतील बाजूस एक सुटा बुरूज, ६-७ इमारती, काही थडगी, भांड्यांचे तुकडे मिळाले असून किल्ल्याची तटबंदी आणि दरवाजा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी एक किल्ला प्रकाशात आल्याने ऐतिहासिक वारशाच्या अभ्यासाला पुन्हा एकदा चालना मिळणार आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.