Home Latest Posts राजधानीत गुढीपाडवा साजरा.

राजधानीत गुढीपाडवा साजरा.

नवी दिल्ली, 22 मार्च (हिं.स.) महाराष्ट्राप्रमाणेच राजधानी दिल्लीस्थित महाराष्ट्र सदन येथे गुढीपाडवा मोठ्या उत्साहात आज साजरा करण्यात आला.

कोपर्निकस मार्गावर असलेल्या महाराष्ट्र सदनात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. यावेळी डॉ.अडपावार यांनी सर्व उपस्थितांना गुढीपाडव्याच्या व नववर्षारंभाच्या शुभेच्छा दिल्या. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक श्रीमती अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह सदनातील व परिचय केंद्रातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

सकाळी आठ वाजता कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनात खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते भगव्या पताका लावत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी गुढी उभारण्यात आली. श्री.गोडसे यांनी गुढी उभी केली व गुढीची पूजा करुन उपस्थित सर्व मराठी बांधवांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षारंभाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी सिन्नर तालुक्यातील बेलु येथील वारकरी शिक्षण संस्थेचे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 20 बालगोपाल वारकऱ्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील चरणाप्रमाणे ‘गुढीया तोरणे, करती कथा गाणे ‘ तर संत चोखोबांच्या अभंगातील चरणानुसार ‘गुढी उभारावी टाळी वाजवावी वाट ही चालावी पंढरीची ‘ या अभंगांसह या राजधानी वरती भगवा निशाण आहे. अशा विविध स्फूर्तीदायक गीतांवर गळ्यात टाळ हाती विणा तर मृदुंगाच्या तालावर पावल्यांसह फुगड्या खेळत या नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रातील अधिकारी कर्मचारी याच्यासह नाशिक मधील पत्रकार प्रशांत धिवंदे, प्रवीण आडके, संजय निकम, दीपक कणसे, गोकुळ लोखंडे,अमोल जोशी,अनय कुलकर्णी, शरद ठोके, श्रीकांत लचके यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.